'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:26 PM2024-09-05T13:26:03+5:302024-09-05T13:28:50+5:30
Jayant Patil Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना जयंत पाटलांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
Jayant Patil News : भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे अनिल देशमुखांपाठोपाठजयंत पाटील यांनी महायुती सरकारवर खडेबोल सुनावले आहेत.
जयंत पाटील काय म्हणाले?
"प्रकरण काय आहे, हे मला माहिती नाही. पण, आमच्या पक्षाच्या नेत्यांना त्रास देण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. मला वाटते की, आता निवडणूक येत आहे आणि सरकारने अशा गोष्टी करायला नको. राजकीय हेतून कारवाई केली जात असल्याचे वाटत आहे. दोन-तीन-चार वर्षांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या, त्यावरून जर आता गुन्हे दाखल होत असतील, मला वाटते हे चुकीचे आहे", असे म्हणत जयंत पाटलांनी महायुती सरकारला सुनावले आहे.
सीबीआयने अनिल देशमुखांविरुद्ध नवीन एफआरआय नोंदवला आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, तक्रारदार विजय पाटील यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संगनमत करून जळगावमधील निंभोरा पोलीस ठाण्यात झिरो एफआरआय दाखल करण्याचा कट रचला होता. भाजपचे नेते आणि अन्य लोकांना यात गोवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे या एफआरआयमध्ये म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक गुन्हा दाखल करत नव्हते -महाजन
या प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "अनिल देशमुख आणि त्यांच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केले, हे सिद्ध झाले आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे माझ्याविरोधात गुन्हा दाखल करत नव्हते. ते महिनाभर थांबले. पुण्यात घटना घडली आणि ३ वर्षांनी जळगाव जिल्ह्यात ६५० किलोमीटर अंतरावर असलेल्या निंभोऱ्यात गुन्हा दाखल कसा करायचा? यासाठी ते तयार नव्हते", असे महाजन म्हणाले.