एसटी कर्मचाऱ्यांकडून मी पैसे घेतले पण...; गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:32 AM2022-04-21T11:32:27+5:302022-04-21T11:33:06+5:30
गिरगाव न्यायालयाच्या आदेशाने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशांतून मालमत्ता, गाडी खरेदी केली.
मुंबई : सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने बुधवारी पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. स्वतःची बाजू मांडताना सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली देत, एस.टी. कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजासाठी घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगा? असाही सवालही त्यांनी केला. तसेच नोटा मोजण्याचे मशीनही तीन हजार रुपयांत खरेदी केल्याचे नमूद केले.
गिरगाव न्यायालयाच्या आदेशाने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशांतून मालमत्ता, गाडी खरेदी केली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. प्रदीप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात ‘रेफरन्स’ म्हणून वाचून दाखविला.
त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तिवाद करीत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने कोर्टात कुठलाच वकील आला नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, पोलीस हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे की, हा एक मोठा घोेटाळा आहे. मी ३०० ते ५०० रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजासाठी घेतले. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो, हे सांगावे? कागदपत्र जप्त केले, ते वकीलपत्र आहे. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला, हे दुःखद आहे. माझे सासू-सासरे स्वातंत्र्यसैनिक आहेत. गाडी घेतली तिची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरिता पैसे दिले ते ऑनलाईन दिल्याचे पुरावे आहेत. २०१४ ची जुनी गाडी मी खरेदी केली आहे. नोटा मोजण्याची मशीन तीन हजारांना घेतली आहे. आपण मुंबईत राहतो, असेही त्यांनी नमूद केले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर महानगर न्यायदंडाधिकारी नदीम पटेल यांनी सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
‘मी कष्टकऱ्यांचा वकील आहे’
कोर्टातून बाहेर पडताना सदावर्ते यांनी सरकारी वकील आणि पत्रकारांकडे पाहून, ‘मी कष्टकऱ्यांचा वकील आहे. हर्षद मेहता नाही. मी हर्षद मेहता होऊ शकत नाही’, असे म्हटले.