मला शास्त्रज्ञ व्हायचंय...
By admin | Published: June 12, 2017 02:27 AM2017-06-12T02:27:52+5:302017-06-12T02:27:52+5:30
देशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘आयआयटी-जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेत औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा ओंकार देशपांडे याने
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशातील नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘आयआयटी-जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेत औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा ओंकार देशपांडे याने देशात आठवा क्रमांक पटकावला. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी ओंकारचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतर संशोधन करून शास्त्रज्ञ व्हायचे, असे या वेळी ओंकारने सांगितले.
‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार देशपांडे याने देशात ८ वा क्रमांक पटकावला. यानिमित्त ओंकारसह त्याच्या आईवडिलांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी बोलताना ओंकार म्हणाला, नववी-दहावीत असतानाच मी ‘जेईई’च्या बेसिकची तयारी सुरू केली होती. तेव्हाच ‘आयआयटी’त शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी ११वी आणि १२वीमध्ये विशेष प्रयत्न केले.
ओंकारचे अभिनंदन करून राजेंद्र दर्डा म्हणाले, देशात पहिल्या दहामध्ये स्थान मिळविणे ही अभिमानाची बाब आहे. बहुतेक विद्यार्थी आयआयटीच्या तयारीसाठी राजस्थानातील कोटाची निवड करतात. मात्र, ओंकारने औरंगाबादेत राहून मिळविलेले यश हे शहरासाठी निश्चित कौतुकास्पद आहे. ओंकारचे वडील डॉ. माणिक देशपांडे, आई डॉ. विशाखा देशपांडे, काका श्याम देशपांडे यांच्यासह ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, निवासी संपादक प्रेमदास राठोड, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सहायक उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, नगीन संगवी आदी या वेळी उपस्थित होते.
सोशल मीडियापासून दूर
अकरावी, बारावीच्या वर्षामध्ये स्मार्ट फोनपासून दूर राहणेच पसंत केले. केवळ संभाषणासाठी मोबाइल वापरला. सोशल मीडिया कधी तरी अर्धा-पाऊणतास लॅपटॉपवर
पाहिला. घरात टीव्ही तासाभरापेक्षा अधिक पाहिला नाही. चित्रपटसुद्धा एकाच वेळी तीन तास पाहिला नाही, तर रोज अर्धा-अर्धा तास करून पाहिल्याचे त्याने सांगितले. आता आयआयटीत प्रवेश मिळाल्यामुळे स्मार्ट फोन घेणार असल्याचे ओंकार म्हणाला.
लहानपणापासूनच
गुणवत्ता जोपासली
ओंकारचे दहावीपर्यंतचे शिक्षण टेंडर केअर होम शाळेत पूर्ण झाले. दहावीला ९६.६० टक्के गुण मिळविले होते. यानंतर देवगिरी महाविद्यालयात ११वी सायन्सला प्रवेश घेतला. दहावीत असतानाच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा उत्तीर्ण झालो.
११वीत ‘किशोर वैज्ञानिक’मध्ये देशभरात २४वा क्रमांक पटकावला होता. यानंतर बारावी परीक्षेत ८९.५४ टक्के मिळविले. ‘सीईटी’त १९२ गुण, बिटसॅटमध्ये ४३८ आणि केमिस्ट्री आॅलिम्पियाडमध्ये सेकंड लेव्हलपर्यंत पात्र ठरलो असल्याचे ओेंकारने सांगितले.
मुंबई आयआयटीला प्राधान्य
देशात आठवा क्रमांक आल्यामुळे कोणत्याही आयआयटीमध्ये प्रवेश मिळणार आहे. मात्र, मुंबई आयआयटीला सर्वाधिक प्राधान्य राहील. यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंंगला प्रवेश घेऊन संशोधनाकडे वळायचे असल्याचेही ओंकारने सांगितले.
असा केला अभ्यास
‘आयआयटी’मध्ये जाण्याचा निर्णय नववी-दहावीमध्ये असतानाच केला होता. यासाठी बेसिक तयारी तेव्हापासून सुरू केली. ११वीमध्ये असताना खासगी शिकवणी लावली. वर्गात साडेपाच तास शिकविलेल्या अभ्यासक्रमांचा उर्वरित दिवसांतील ६ ते ७ तासांमध्ये अभ्यास केला. शक्यतो शिकविलेला अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करण्याची सवय लावली होती.
अभ्यासानंतर झोपण्याचा नियम कटाक्षाने पाळला. किमान ८ तास झोप घेतली. सकाळी ६ ते ७ वाजता उठण्याची सवय लावल्याचे ओंकारने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळेच हे यश मिळाल्याचे ओंकारने स्पष्ट केले.