मराठीचा विकास करायला हवा
By Admin | Published: February 28, 2017 02:48 AM2017-02-28T02:48:21+5:302017-02-28T02:48:21+5:30
मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनाची जबाबदारी मराठी भाषिकांनी पार पाडायला हवी
म्हसळा : मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनाची जबाबदारी मराठी भाषिकांनी पार पाडायला हवी, तरच मराठी भाषेचा पूर्णपणे उदय होऊ शकतो. जाणीवपूर्वक व जबाबदारीने मराठी भाषेचा विकास हा करायला हवा. मला आज मराठी भाषेचा अभिमान वाटत आहे व मी मराठी भाषेचा प्राध्यापक असल्याचा मला गर्व आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा.दिगंबर टेकळे यांनी के ले.
येथील कोकण उन्नती मित्र मंडळ, मुंबईच्या वसंतराव नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी भाषा व साहित्य मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी टेकळे बोलत होते. कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फवि.वा. शिरवाडकर यांचा जन्म दिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी महाराष्ट्र शासनाने संगणक व महाजालावरील मराठी तसेच युनिकोड आणि विकिपीडियावर लेखनासाठी आवाहन केले होते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्वलिखित स्वरूपात कवितांचे वाचन करण्याचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्र माची सुरवात सायली चव्हाण, वेदिका कोबनाक आदींसह विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने करण्यात आली. अजित जंगम, मोहन जाधव, नीलम वारळकर आणि इतर विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी करडे, साळवे यांनी काव्यवाचनात भाग घेतला.
प्रा.समेळ यांनी विकिपीडियावर लिखाण करण्याचे आवाहन केले. सायली चव्हाण, नीलम वारळकर, वेदिका कोबनाक व इतर विद्यार्थिनींनी गायलेल्या पसायदान या गीताने कार्यक्र माची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)
>प्रवाशांना मराठी पुस्तकांची भेट
श्रीवर्धन : रा. प. मंडळाच्या श्रीवर्धन आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा उगम, भाषेतील लिखित साहित्य व मराठी अस्मिता या विविध विषयांवर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. नगर पालिका विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी मातृभाषेतून दिलेल्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होवू शकतो असे सांगितले.
वाचनालयाचे राज्य कार्याध्यक्ष मनोज गोगटे यांनी जीवनातील वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी दिवशी रा. प. महामंडळाच्या वतीने स्थानकातील उपस्थित प्रवासी वर्गास मराठी भाषेतील पुस्तके भेट देण्यात आली. आगार प्रमुख चेतन देवधर यांनी सर्व प्रवाशांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आगार लेखाकार हरिश्चंद्र पवार आदींसह कर्मचारी उपस्थित होते.