मीच ५ वर्षे मुख्यमंत्री!
By Admin | Published: October 30, 2016 12:59 AM2016-10-30T00:59:08+5:302016-10-30T00:59:08+5:30
मी पाचवर्षे मुख्यमंत्रीपदी राहणार आहे, आम्ही जे बोलतो त्याचा विपर्यास माध्यमांकडून केला जातो. विशेषत: राष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना मराठी कळत नसल्याने
मुंबई : मी पाचवर्षे मुख्यमंत्रीपदी राहणार आहे, आम्ही जे बोलतो त्याचा विपर्यास माध्यमांकडून केला जातो. विशेषत: राष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना मराठी कळत नसल्याने ते अनेकदा चुकीचा अर्थ काढतात, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
दिवाळी शुभेच्छांच्या निमित्ताने वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘कायद्याचे पालन करा नाही तर, असे कायदे काय कामाचे?’ अशी प्रतिक्रीया दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘मुंढे यांच्याबाबत मी कायदाच पाळत आहे’, असे सांगून कारवाईविषयीची भूमिका गुलदस्त्याच ठेवली.
एकनाथ खडसे निर्दोष ठरले तर मंत्रिमंडळात घेणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खडसे मंत्रिमंडळात असलेले मला आवडेल, असे फडणवीस म्हणाले. करण जोहरच्या सिनेमात पाक कलाकारांनी काम केले, त्या बदल्यात त्यांनी सैनिक कल्याण निधीसाठी ५ कोटी देण्याचे ठरलेच नव्हते ! मुकेश भट्ट यांनी पण सांगितले होते की, पाच कोटी देण्याबाबत जबरदस्ती नव्हती; पण ती मागणी राज ठाकरे यांनी केली होती. बैठकीतही तसे काहीच ठरले नव्हते. परंतु राष्ट्रीय माध्यमांना मराठी न समजल्यामुळे त्यांनी चुकीची बातमी दाखवली असेही ते म्हणाले. शहीद जवानाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे १५ लाखांची मदत दिली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
महाराट्र उत्तम राज्य
सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्र उत्तम राज्य होईल, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक आहे, विविध जातीचे मोर्चे निघत आहेत; पण हे मोर्चे विशिष्ट समाजांच्या विरोधात नसल्याने सामाजिक सलोखा बिघडेल अशी स्थिती नाही, असेही ते म्हणाले.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बंदरामध्ये आलेल्या ‘गेटिंग हाँगकाँग’ कंपनीच्या ‘ड्रीम क्रूझ’ या आंतरराष्ट्रीय पंचतारांकित पर्यटन जहाजाचे स्वागत शनिवारी करण्यात आले.
ड्रीम क्रूझ ही गेटिंग हाँगकाँग या कंपनीचे प्रवासी वाहतूक जहाज आहे. एकूण १८ मजली जहाजामध्ये मिनी थिएटर, कॅसिनो, चार हजार लोक राहू शकतील, अशी व्यवस्था आहे.
सुमारे ३५ रेस्टॉरंट, नृत्यशाळा, शॉपिंग सेंटर आदी पंचतारांकित सोईसुविधा क्रूझमध्ये आहेत, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही येथे होणार आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये सिंगापूर, दुबईपेक्षाही चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. येथील टर्मिनलमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार सुविधा देण्यात येत आहेत.
येत्या वर्षभरात मुंबई बंदरात ५९ मोठया क्रूझ येणार असून, हा आकडा शंभरवर जाण्याची शक्यता आहे. पर्यटन नौकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने उचललेल्या विविध उपाययोजनांचा हा परिपाक आहे.
मालवाहू जहाजांच्या तुलनेत जल पर्यटन नौकांपासून मिळणारा महसूल कमी असला, तरीसुद्धा पर्यटन नौकांना विशिष्ट प्रमाणात प्राधान्य देण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला आहे.
२०१६-१७ या वर्षांत एकूण ५९ जल पर्यटन नौकांनी मुंबई बंदरात येत असल्याची खातरजमा केली आहे. गेल्या वर्षी केवळ ३७ जल पर्यटन नौकांनी मुंबई बंदरात आगमनाची वर्दी दिली होती.