Eknath Khadse : नाव घेऊन सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मला त्रास झाला; खडसेंचा थेट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 02:53 PM2020-09-10T14:53:44+5:302020-09-10T16:16:05+5:30
Eknath Khadse attack on Devendra Fadnavis: "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
जळगाव - भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी पुन्हा एकदा पक्षावर जोरदार टीका केली आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे सांगत एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो, असा थेट आरोपही खडसे यांनी केला.
एकनाथ खडसे यांच्यावरील "जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांनी पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
खडसे म्हणाले, ''माझ्यावर अन्याय झाला आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार. मुखमंत्री तेव्हा अंजली दमानिया यांना वेळ देत भेटत होते. पण खडसें याना भेटत नव्हते. पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही,'' असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.
''मी नाराज आहे. आता लोक म्हणतात की, नाथाभाऊचं काही अडकलं असेल म्हणून ते पक्षात अन्याय होऊनही पक्ष सोडत नाही. पण असं काही नाही. माझा जीव पक्षावर जडला आहे. म्हणून सहन करतोय. पर्याय भरपूर आहेत.मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो. चुकीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांमध्ये धमक असते. ती धमक माझ्यात तुम्ही निर्माण केली. तीच माझी शक्ती आहे, ''असे खडसे यांनी सांगितले.
''उत्तर महाराष्ट्राचे नशीब असे की, भाऊसाहेब हिरे, रोहिदासदा, मधुकरराव चौधरी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आली होती. पण त्यांना संपविण्याचे प्रयत्न झाले. तसेच माझ्या सोबत झाले, असा दावा खडसे यांनी केला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र खान्देशला कधीच संधी मिळाली नाही,'' अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी