अनू मलिकच्या ‘त्या’ वाक्याने मी खूपच घाबरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 06:02 AM2018-10-19T06:02:34+5:302018-10-19T06:02:42+5:30
मुंबई : संगीतकार अनू मलिकवर आरोप करताना श्वेता पंडितने ट्विटमध्ये म्हटले आहे की, २००० साली ‘मोहब्बते’ या चित्रपटात मला ...
मुंबई : संगीतकार अनू मलिकवर आरोप करताना श्वेता पंडितने ट्विटमध्ये म्हटले आहे की, २००० साली ‘मोहब्बते’ या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी माझे खूप कौतुक झाले होते. मला गाण्यातच करिअर करायचे होते.
अनू मलिक यांचे व्यवस्थापक मुस्तफा यांचा २००१ मध्ये मला फोन आला आणि त्यांनी एम्पायर स्टुडिओत बोलावले. मी खूपच उत्सुक होते. अनू मलिक यांनी मला गाण्यास सांगितले आणि माझ्या गाण्यावर ते खूश झाले?
अनू म्हणाले, मी तुला शान आणि सुनिधीसोबत गाण्याची संधी देईन, पण मला आधी एक किस दे. या त्यांच्या अजब मागणीनंतर मी खूप घाबरले. तेव्हा मी जेमतेम १५ वर्षांची होते. अनू मलिक माझ्या कुटुंबीयांना चांगले ओळखत होते. स्वत:ला दोन मुली असताना ते माझ्याशी असे कसे वागले, हा प्रश्न मला तेव्हा सारखा भेडसावत होता, असे तिने ट्विट केले आहे. या घटनेचा माझ्या मनावर इतका गंभीर परिणाम झाला की मी ही इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते, असे ट्विट श्वेता पंडितने केले आहे.
ज्या तरुणी अनू मलिक यांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत, त्यांनी समोर येऊन आवाज उठवण्याचे आवाहन श्वेताने ट्विटरवर केले आहे. तसेच गायिका सोना मोहपात्राचेही या वेळी तिने आभार मानले आहेत.
अनेक मुलींना मी फसवले
‘मी टू’च्या वादळात अडकलेल्या साजिद खानने एका मुलाखतीत, मी अनेक मुलींशी खोटे बोललो, त्यांना फसवले आणि मला या गोष्टींचा त्या वेळी फरक पडत नव्हता, असे म्हटल्याचे उघड झाले आहे. तेव्हा साजिद छोट्या पडद्यावर काम करत होता आणि करिअरची गाडीसुद्धा रुळावर होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये दिग्दर्शनावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे त्याने सांगितले. चित्रपट दिग्दर्शनात मग्न झाल्यावर मी फारसा मुलींकडे आकर्षित झालो नाही. तेवढा वेळच मला मिळाला नाही. कारण फार मोठी जबाबदारी तुमच्यावर असते आणि माझ्या या मताशी कदाचित इतर दिग्दर्शकसुद्धा सहमत असतील.