'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:37 PM2024-05-10T12:37:24+5:302024-05-10T12:39:53+5:30
राज्याच्या माजी गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गोप्यस्फोट केला आहे
Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अनिल देशमुख यांचा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे अनिल देशमुख यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर जामीनावर देशमुख बाहेर आले. अशातच आता त्यांनी फडणवीसांवर आरोप करत आपण कोणताही समझोता केला नसल्याचे म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये बुधवारी रात्री मुक्कामी होते. त्यामुळे तिघांनी एकमेकांच्या भेटी घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र तिघांनीही कोणतीही भेट न झाल्याचे म्हटलं. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करणारे शपथपत्र तयार करुन आणायला सांगितले होते, असा गौप्यस्फोट देशमुखांनी केला.
देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे माणूस पाठवला होता - अनिल देशमुख
"तब्बल १४ महिन्यांनी मी बाहेर आलो. त्यावेळी देवेंद्र फडणीस यांनी माझ्याकडे समझौता करण्यासाठी त्यांचा माणूस पाठवला होता. त्यांनी फोन करुन सांगितले की, तुम्ही मला एक शपथपत्र करुन द्या. जर ते दिलं तर तुमच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई होणार नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते की, अनिल देशमुख जन्मभर तुमच्यासोबत समझौता करणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करुन अडचणीत आणा अशा प्रकारचे शपथपत्र तयार करुन आणायला सांगितले होते," असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला.
काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेल - देवेंद्र फडणवीस
"कपोलकल्पित सत्य अनिल देशमुख बोलत आहे. यासंदर्भात बरेच सत्य माझ्याकडे आहे. योग्यवेळी ते सत्य मी बाहेर काढेल. त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे. पण ज्यावेळी मी सत्य बाहेर काढेल त्यावेळी त्यांना लक्षात येईल. आज यापेक्षा जास्त काही बोलत नाही. जी काही घटना घडली तेव्हा ते सरकारमध्ये होते. तेव्हाच १०० कोटींचा घोटाळा झाला. त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले हे सगळं माझ्याकडे आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.