"मी तुमच्यासोबत येतो, पण...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत भाजपा नेत्यांना थेट सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:52 PM2022-03-25T16:52:51+5:302022-03-25T16:53:13+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहाला संबोधित करताना भाजपा नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मुंबई-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सभागृहाला संबोधित करताना भाजपा नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. "दुसऱ्यांना वाईट म्हणण्याआधी स्वत:कडे पाहिलं पाहिजे. तुम्हाला सत्ता पाहिजे ना? मी येतो तुमच्यासोबत. पण सत्तेसाठी नाही. मर्द असाल तर मला तुरुंगात टाका. कुटुंबाशी काय खेळता? कुटुंबीय आणि शिवसैनिकांना त्रास देण्यापेक्षा मी आज तुम्हाला सांगतो. हिंमत असेल तर माझ्याशी लढा आणि मी तुमच्यासोबत येतो मला तुरुंगात टाका", असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केला.
"केंद्रीय यंत्रणा आज ज्यापद्धतीनं काम करत आहेत ते पाहता ही ईडी आहे की घरगडी तेच कळत नाही. मलिकांच्या संपत्तीवर टाच, देशमुखांच्या संपत्तीवर टाच. कुटुंबीयांची बदनामी करायची. हे अतिशय नीच आणि निंदनीय राजकारण आहे. टाचेला मी घाबरत नाही...खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्रीय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर भाष्य केलं.
सत्तेसाठी जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका
"केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन कुटुंबीयांना त्रास देण्याचा प्रकार अत्यंत नीच आणि निंदनीय आहे. ज्या शिवसैनिकांनं ९० च्या दंगलीत आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदूंच्या बचावासाठी जीवाचं रान केलं. आज त्यांना तुम्ही त्रास देत आहात. मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो. त्यांना कशाला त्रास देता. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी जीव जळत असेल तर मी येतो तुम्ही मला तुरुंगात टाका", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तेव्हा मलिक, देशमुख चालले असते का?
"दाऊदचा विषय सध्या खूप चघळला जात आहे. रामाच्या नावानं मतं मागून झाली. आता दाऊदच्या नावानं मत मागणार का? दाऊद नेमका आहे तरी कुठं हे काही तुम्हाला माहित आहे का? अमेरिकेत ओबामानं कधी ओसामाच्या नावानं मतं मागितली होती का?", असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच फडणवीसांनी खरंतर 'रॉ'मध्ये घेतलं पाहिजे. तिथं जे झटपट प्रकरणं सोडवतील. ज्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांवर तुम्ही आरोप करत आहात. त्यांना आज तुरुंगात टाकलं आहे. तेच मलिक आणि देशमुख तुम्हाला पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर चालले असते ना?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.