एकाच घरात दोन मंत्रिपदं? रोहित पवारदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:21 PM2019-12-25T13:21:29+5:302019-12-25T13:27:40+5:30
पहिल्यांदाच आमदार झालेले रोहित पवार मंत्रिपदासाठी इच्छुक
कर्जत-जामखेड: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला जवळपास महिनात होत आला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास सोनं करू, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही, हा निर्णय पक्षाचा आहे. मात्र संधी मिळाल्यास सोनं करू, असं रोहित पवार यांनी म्हटलं. माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे रोहित पवारांनादेखील मंत्रिपदं दिल्यास एकाच घरात दोन मंत्रिपदं जाऊ शकतात.
रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मतदारसंघातल्या विविध समस्यांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी काही प्रश्नांची उत्तर दिली. मंत्रिपदाची अप्रत्यक्ष इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिली तर सोनं करेन, अशी इच्छा बोलून दाखवली. ‘काम करणाऱ्यांना संधी मिळायला हवी, अशी लोकांची इच्छा असते. बोलणारे बोलतच असतात. मी कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत आहे. मंत्रिपदासारखी जबाबदारी आल्यास ती स्वीकारावी लागेल,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं.
अहमदनगर जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही रोहित पवार यांनी दिली. ‘आपल्याला आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मात्र पक्ष वैयक्तिक आवडींवर चालत नाही. पक्ष चालवताना अनेक घटकांचा आणि समीकरणांचा विचार केला जातो. पण मला संधी मिळाल्यास तिचं सोनं करेन,’ असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.