पुढील वर्षीही माझ्याच हस्ते विठ्ठलाची महापूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:59 AM2019-07-13T05:59:17+5:302019-07-13T05:59:30+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांचा आत्मविश्वास
पंढरपूर : राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, बळीराजा दुष्काळातून मुक्त व्हावा आणि जनतेच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, अशी मागणी आपण पांडुरंगाकडे केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेनंतर पत्रकारांना सांगितले. पण त्याचवेळी पुढच्या वर्षी महापूजेलाही आपणच येऊ, असा आत्मविश्वासही व्यक्त केला.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटे २़३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली़ मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातूर जिल्ह्यातील विठ्ठल मारुती चव्हाण (वय ६१) व त्यांच्या पत्नी प्रयाग विठ्ठल चव्हाण (वय ५५, रा़ सांगवी, सुनेगाव तांडा, ता़ अहमदपूर) यांना मिळाला़ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभराचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला़
मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शेतकरी आणि वारकरी संप्रदायातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
उद्धव मुख्यमंत्री झाले
तर आनंदच : नीलम गोºहे
मुख्यमंत्रिपद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मिळाले तर आम्हाला आनंद होईल, असे सूचक वक्तव्य विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोºहे यांनी सोलापुरात केले. त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र बसून घेतील; पण उद्धवजी मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल.
स्वच्छ दिंडीचे मानकरी
मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा स्वच्छ दिंडीचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्यातील मारुतीबुवा कराडकर दिंडीला १ लाख रुपये व मानचिन्ह, दुसºया क्रमांकाचा पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सद्गुरूम्हातारबाबा पाथरुडकर दिंडीला ७५ हजार रुपये रोख व मानचिन्ह तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला ५० हजार रुपये व मानचिन्ह अशा स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.