''शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:10 PM2019-10-01T13:10:46+5:302019-10-01T13:12:03+5:30
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे.
मुंबई: महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजित बिचुकले यांनी देखील विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं आश्वासन अभिजित यांनी दिले आहे.
अभिजित बिचुकले यांनी सांगितले की, साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणुक आणि आगामी विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मैदानात उतरणार आहे. तसेच साताऱ्यातील नागरिकांनी शरद पवार यांना मोठं केलं असून मलाही सातारकर मोठं करतील असा अभिजित यांनी विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे शरद पवारांना देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं देखील अभिजित बिचुकलेंनी यावेळी सांगितले.
अभिजित बिचुकले हे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांच्याविरोधात लढल्याने चर्चेत आले होते. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे विधानसभेसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुक होणार असून उदयराजेंविरुद्ध अभिजित बिचुकले पुन्हा उभे राहून निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर बिचुकलेनी मराठी बिग बॉसमध्ये एन्ट्री केली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी अखिल बहुजन समाज सेना पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती.