‘आई’ महोत्सवातून होणार विचारमंथन
By admin | Published: November 2, 2016 01:53 AM2016-11-02T01:53:51+5:302016-11-02T01:53:51+5:30
‘आई’ हा शब्द उच्चारताच प्रेमळ आणि मायेची सावली देणारी प्रतिमा क्षणार्धात उभी राहते.
मुंबई : ‘आई’ हा शब्द उच्चारताच प्रेमळ आणि मायेची सावली देणारी प्रतिमा क्षणार्धात उभी राहते. आईविषयीचे ऋण फेडणाऱ्या
‘आई’ महोत्सवाचे आयोजन चांदिवलीत करण्यात आले आहे. ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ७ वाजता चांदिवली म्हाडा कॉलनीतील गणेश मैदान येथे हा महोत्सव रंगणार आहे.
चांदिवली म्हाडा विकास समिती आणि नारीशक्ती तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आई’वर आधारित व्याख्यानांची पुष्पे अनेक मान्यवर गुंफणार आहेत. ३ नोव्हेंबर रोजी जे. जे. रुग्णालय मुख्य अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने ‘मी व माझी आई’ या विषयावर बोलतील. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. तर ४ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर ‘आई’ या विषयावर कीर्तनरुपी व्याख्यान देतील. वीरमाता अनुराधा गोरे यांची या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.
५ नोव्हेंबर रोजी ‘आईच्या काळजातून..एक आत्मकथन! ’ याविषयावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ विचार मांडतील. ठाण्यातील डीसीपी रश्मी करंदीकर यांची या दिवशी खास उपस्थिती असेल. तर शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील ‘जिजाऊच्या संस्कारातून साकारलेले स्वराज्य... अर्थात छत्रपती शिवाजी महाराज ’ या विषयावर रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी प्रकाशझोत टाकणार आहेत. यावेळी कवी अरुण म्हात्रे यांच्या काव्यमैफिलाचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. (प्रतिनिधी)