'मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; हसन मुश्रीफ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:46 IST2025-04-05T13:45:17+5:302025-04-05T13:46:15+5:30
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांवरच खापर फोडले आहे. त्यावरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयावर संताप व्यक्त केला.

'मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; हसन मुश्रीफ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर भडकले
Deenanath Mangeshkar Hospital News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मोठ्या वादात सापडले आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला भरती करून घेण्यास नकार दिल्याच्या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांवरच ठपका ठेवला. रुग्णालयाने आधी १० लाख रुपये भरण्यास सांगितले होते. आता प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी करून स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न केल्याची टीका होत आहे. दरम्यान,वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याच मुद्द्यावरून रुग्णालयाला चांगलेच सुनावले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी यावर उत्तर देताना रुग्णालयाबद्दल काही गंभीर बाबी मांडल्या.
वाचा >>'इमर्जन्सी'मधील कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही -दीनानाथ रुग्णालय
हसन मुश्रीफ म्हणाले, "मी विधी न्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये अनेक बदल केले. वास्तविक यांना सवलती अनेक आहेत. त्यांना कसलाही टॅक्स नाही, ही सगळ्यात मोठी सवलत आहे. दहा टक्के फक्त त्यांनी गरीब रुग्णांवर उपचार करायचे आहेत. उच्च न्यायालयाने तर दहा टक्क्यांऐवजी, त्यांची एकूण उलाढाल आहे, त्यांच्या दोन टक्क्यांची सवलत दिलेली आहे. असं असतानाही ते गरिबांची सेवा करत नाहीत", असा गंभीर आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करण्यास नकार का?
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "महात्मा फुले जीवनदायी योजना सुद्धा ते लागू करत नाहीत. त्याचे दर कमी आहेत. त्याचा आपल्या इतर व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतं. माझी विनंती आहे की, त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी. तर अशा घटना घडणार नाहीत."
रुग्णालयाने केलेल्या अंतर्गत चौकशीवरून मुश्रीफांनी सुनावलं
दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने घटनेची अंतर्गत चौकशी केली. याला पीडित महिला आणि कुटुंबीयच जबाबदार असल्याचा ठपका रुग्णालयाने ठेवला. याबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, "मीच समिती नेमणार. मीच चौकशी करणार, मग मी कसा दोषी होणार? माझं म्हणणं आहे की, असं नाही."
"ती महिला आलेली होती. तिला फक्त भरती करून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? पब्लिक ट्रस्ट अॅक्टखाली तिचं बिल झालं असतं. महात्मा फुले जीवनदायी योजना लागू नाही. त्यांचं रुग्णालय लागूच करू देत नाही. त्यामुळेच अशा घटना घडतात", अशा शब्दात मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला.
"नातेवाईकांचा आक्रोश. एखाद्याच्या मृत्यू होणं, फार वाईट. आता दोन मुली झाल्या, काय करायचं त्यांनी? त्यांनी थोडं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे", असे खडेबोल हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला सुनावले.