Uddhav Thackeray: माझ्यावरच्या टीकेचे मी बघून घेईन, योग्यवेळी समाचार घेणार; उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 07:43 AM2022-01-06T07:43:57+5:302022-01-06T07:45:20+5:30
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांची बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझ्यावर होत असलेल्या टीकेची मला कल्पना आहे. सध्या ही टीका मी शांतपणे पाहतो आहे. या वैयक्तिक हल्ल्याचा योग्यवेळी समाचार घेणार असल्याचे सांगतानाच आगामी पालिका निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी बैठकीला संबोधित केले. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदारांसह शिवसेना नेते या बैठकीला उपस्थित होते. माझ्यावर होत असलेली टीका सध्या मी शांतपणे पाहतो आहे. ज्यांना जे दाखवायचे ते योग्यवेळी दाखवून देऊ. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असे ठाकरे यावेळी म्हणाले. मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचे त्याला मी योग्यवेळी दाखवून देईन. माझ्या कामाने मी माझी पोचपावती देतो, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
मोठमोठे बॅनर लावू नका - आदित्य
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत आदित्य ठाकरे यांनीही संबोधित केले. बॅनरबाजी करण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. मोठेमोठे बॅनर लावू नका, ते जनतेला आवडत नाहीत, असेही आदित्य यांनी यावेळी सांगितले. जनतेची कामे करा आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्पही करा.