मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2017 10:12 AM2017-03-09T10:12:54+5:302017-03-09T12:17:10+5:30
मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी स्वत: भिकारी होणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 9 - मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी स्वत: भिकारी होणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार तानाजी सावंत यांनी केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या प्रचारात लोकांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.
तानाजी सावंत बोलले आहेत की, 'सव्वाशे - दिडशे कोटींचा कारखाना चालत चालत खरेदी करु शकतो. मला कोणतीच अडचण येणार नाही. लोकांचा काही गैरसमज झाला असेल तानाजी सावंत भिकारी - बिकारी झाला आहे काय ? मी अख्ख्या महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण स्वत: भिकारी होणार नाही'.
एबीपी माझाशी बोलताना तानाजी सावंत यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास लावला गेला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'जाणीवपूर्वक माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. मी तळागाळात काम करणारा आमदार आहे. माझं पूर्ण भाषण ऐका, त्यातील एक वाक्य काढून संपूर्ण भाषणाचा अर्थ लागणार नाही', अशी बाजू तानाजी सावंत यांनी मांडली आहे. तसंच जर माझ्यामुळे महाराष्ट्राची भावना दुखावली असेल तर मी बिनशर्त माफी मागतो असं बोलले आहेत.