मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:40 PM2024-05-12T12:40:43+5:302024-05-12T12:41:21+5:30
महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय, मी त्याला मदत करत आहे असं खडसेंनी सांगितले.
जळगाव - मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, माझा विधान परिषदेचा कार्यकाळ अजूनही बाकी आहे असं सांगत एकनाथ खडसेंनी राजकारणातून निवृत्त होणार का या प्रश्नावर थेट उत्तर दिले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मी अजून ५ वर्षासाठी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले मी पद मागणार नाही. त्यामुळे मला राजीनामा देण्याची गरज नाही. मी राजकारणातून निवृत्ती घेतली नाही. मी राजकीय माणूस आहे.पण सध्या निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही असं स्पष्ट मत खडसेंनी व्यक्त केले.
त्यासोबतच मी भाजपात जेव्हा प्रवेश करायचा ठरवलं तेव्हा रोहिणी खडसेंना सोबत येण्यास सांगितले, परंतु त्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचं ठरवले. शरद पवारांसोबत माझी नाळ जोडलेली आहे. राष्ट्रवादीत भवितव्य आहे असं त्यांना वाटते म्हणून त्यांनी माझ्यासोबत भाजपात येण्यास नकार दिला. रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या प्रचारात आहेत असं एकनाथ खडसेंनी सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय, मी त्याला मदत करत आहे. याठिकाणी पूर्वीसारखं वातावरण नाही. परंतु मोदी पंतप्रधान हवेत अशी नागरिकांची इच्छा आहे. नाराजी असली तरी मोदी पंतप्रधान हवेत असं लोकांना वाटते. केंद्र सरकारविरोधात नाराजी दिसत नाही. परंतु काही मुद्द्यांवर राज्य सरकारविरोधी नाराजी दिसते. कमी अधिक प्रमाणात अँन्टी इन्क्मबसी दिसते, पण लोक भाजपाला पुन्हा निवडून देण्यासाठी उत्सुक आहेत असंही एकनाथ खडसेंनी सांगितले.
पक्षप्रवेशाला विरोध नाही, नाराजी...
भाजपाचे देशाचे महामंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट सांगितलंय, एकनाथ खडसेंचा पक्षप्रवेश निश्चित आहे. राज्यात काही लोकांनी नाराजी होती. सर्वच गुणगान करतील असं नसते. ही नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय. भाजपात प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन आणि मला एकत्र काम करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाच्या हिताचे काही असेल त्यांनी दोघं मिळून निर्णय घेऊ. पक्षप्रवेशाबाबत कुणाचाही विरोध नाही, नाराजीचा सूर होता, तो मावळला आहे असंही एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.