Suresh Dhas : मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे - सुरेश धस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:42 IST2024-12-28T18:40:53+5:302024-12-28T18:42:15+5:30
Suresh Dhas And Prajakta Mali : प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी माफी मागणार नाही, माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे

Suresh Dhas : मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे - सुरेश धस
भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विधानानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने थेट पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. तसेच प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं म्हटलं होतं. यानंतर प्राजक्ताने "सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन" असं म्हटलं आहे.
प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही, माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे" असं म्हटलं आहे. तसेच निषेध म्हणून मी महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचं बंद करतो असंही म्हटलं. "मी माफी मागणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून, पाया पडून एक विनंती आहे की, या खून प्रकरणावरचं लक्ष तुम्ही कोणत्याही हिरो-हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माझी आणि त्यांची नीट ओळखही नाही."
"मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहत असतो. जर त्यांनी माझा निषेध केला तर मी त्यांचा निषेध म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा बघायचं बंद करतो. माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कोणतीही बाब मी बोललेलो नाही. संतोष देशमुख हत्येपासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे. इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका. माझ्या ठायी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे" असं सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी - प्राजक्ता माळी
"सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी निषेध करते. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. मी या सगळ्याला शांतपणे सामोरी जातीय. पण, याला माझी मुकसंमती आहे असं नाही. मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी महिला कलाकारांची नावं घेणं बंद करा. हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन."
"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी विनंती करते. माझी आई झोपलेली नाही. माझ्या भावाने सगळे सोशल मीडिया अकाऊंट्स डिलीट केलेत. माझ्या कुटुंबावरही याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय. या सगळ्याला तोंड देणं हे अजिबात सोपं नाही. मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करते की त्यांनी याबाबत ठोस कारवाई करावी. करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वत: एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होणार? मी सांगू इच्छिते की तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे" असं प्राजक्ता माळीने म्हटलं आहे.