Breaking; मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही; गणपतराव देशमुखांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:10 PM2019-07-29T13:10:09+5:302019-07-29T13:16:10+5:30
जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा उमेदवार देणार : गणपतराव देशमुख
सांगोला : पन्नास वर्षांहून अधिक काळ जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली़ त्याबद्दल जनतेचे आभार. परंतु २०१९ च्या निवडणुकीतही शेतकरी कामगार पक्ष देईल तो उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विधानसभेत पाठवून पुन्हा एकदा सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवू असे आवाहन आ.गणपतराव देशमुख यांनी केले आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत शेकापचा नवीन कार्यक्षम आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असणारा उमेदवार मी ठरविणार आहे. उमेदवारांच्या नावावर एकमत न झाल्यास तालुक्यातील प्रत्येक गावातून शेतकरी कामगार पक्षाच्या एका कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन शेकापचा नवीन उमेदवार ठरविणार असल्याचे आ.देशमुख यांनी जाहीर केले. कोळा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, १९६२ पासून सांगोला तालुक्यातील जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. आता शरीर साथ देत नसल्याने २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडून नव्या उमेदवाराला संधी देण्याची वेळ आली आहे. संपूर्ण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची संघटना मजबूत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल बोलत असताना आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाने शेकापला मदत केल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले़ १९५२ पासून सांगोला हा शेकापचाच बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडे उमेदवारीची मागणी करत असली तरी याबाबत मी वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही. शेकापचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीला उमेदवारी द्यायची की नाही? याचा निर्णय घेतील.