विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका आक्रमकपणे पार पाडणार - प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:22 PM2019-12-16T16:22:38+5:302019-12-16T16:23:52+5:30
विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी झालेल्या निवडीबद्दल 'लोकमत'शी बोलताना प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया
नागपूर : भाजपा हा गुणवत्ता ओळखणारा पक्ष आहे. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांनी आपली गुणवत्ता ओळखून पक्षात स्थान दिले होते. यावेळी विरोधी पक्षनेते पद मिळाले आहे. या पदाचा वापर करून आक्रमकपणे विरोधीपक्षनेते पदाची जबाबदारी पार पाडू, असे प्रतिपादन प्रवीण दरेकर यांनी केले.
विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी झालेल्या निवडीबद्दल 'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, आपली निवड होणार या संदर्भात कसलीही कल्पना नव्हती. आज सकाळीच कळले. तशी अपेक्षाही नव्हती.या क्षणी आपणास वडिलांची आणि आईची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले.आपले वडील कंडक्टर होते. रायगड जिल्ह्यातून आपली वाटचाल झाली. आई डोक्यावर मासे घेऊन गावात विकायची. तीचे परिश्रम सार्थकी लागल्याची कृतार्थ भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावर ते म्हणाले, सावरकर हे देशाचे अभिमान आहेत. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपमानास्पद बोलल्याचा जाब त्यांना देशाला द्यावाच लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुलांनेही उद्धवजी ठाकरे यांच्याकडे राहुल गांधींना जोड्याने मारण्याची सूचना केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आपणास आदर आहे. त्यांच्या काळातील शिवसेना वेगळी होती. ती परिणामाची चिंता करत नसायची. जे बोलले ते करायचे. ते राष्ट्रवादी विचाराचे होते. आज मात्र तशी स्थिती नाही. सत्तेसाठी झुकलेली शिवसेना आज महाराष्ट्रात दिसत आहे, अशी बोचरी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.