ईडीही आवळणार इक्बाल कासकरभोवती फास! मनी लॉण्ड्रीगबाबत चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:00 PM2017-09-26T20:00:02+5:302017-09-26T21:31:50+5:30
खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. अवैध संपत्ती, मालमत्तेचे अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे.
मुंबई, दि. २६ - खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पुढील अडचणी आणखी वाढणार आहेत. अवैध संपत्ती, मालमत्तेचे अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. याबाबत त्याच्यासह त्याच्या सहका-यावर येत्या काही दिवसामध्ये ‘मॅनी लॉण्ड्रीग’बाबत गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी इकबाल कासकर गेल्या आठवड्याभरापासून ठाण्याच्या खंडणीविरोधी पोलिसांच्या ताब्यात आहे. या गुन्ह्यातील धागेदो-याबरोबरच त्याचे भाऊ दाऊद,अनिस इब्राहिम यांच्याबाबत इंत्यभूत माहिती मिळविण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे आयबीच्या अधिका-यांकडूनही चौकशी केली जात आहे. इक्बालचे गेल्या काही काळापासून दाऊदशी पटत नसलेतरी त्याच्या जीवावरच त्याची बिल्डर, उद्योजकांकडून हप्ता वसूली सुरु आहे.त्यातून त्याने करोडोची माया उकळली असून अनेक उद्योगामध्ये पैसे गुंतविल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ईडीनेही त्याकडे लक्ष केंद्रीत केले असून इकबालकडील आता पर्यतच्या तपासाबाबच्या माहितीसाठी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला आहे. इक्बाल,तसेच इसरार सय्यद, मुमताज शेख व अन्य सहकाºयांनी खंडणीतून मिळविलेल्या पैसा अन्य उद्योगात भागीदारीमध्ये गुंतविल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यासह संबंधित उद्योजक, व्यापाºयांच्याकडे चौकशी केली जाणार असून त्यातील तथ्यानुसार इक्बाल व संबंधितांवर ‘मनी लॉण्ड्रीग’बाबतचा गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्या बेहिशेबी ,अवैध संपत्ती, गुंतवणूकीबाबतची पाळेमुळे शोधली जाणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
झाकीर नाईकशी ‘कनेक्शन’?
वादग्रस्त मुस्लिम विचारवंत झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फौडेशन (आयआरएफ) ला डी गॅगकडून देणग्या देण्यात आल्या आहेत का, याबाबतही तपास केला जात आहे. तपास अधिका-यांनी या घटनेचा इन्कार केला असलातरी त्यादृष्टिने इकबालकडे त्याची पडताळणी केली जात असल्याचे अतिवरिष्ठ अधिका-यांकडून सांगण्यात आले.