काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:20 AM2024-08-17T07:20:50+5:302024-08-17T07:21:27+5:30

मविआने फुंकले प्रचाराचे रणशिंग

I will support if Congress, NCP announce the face of Chief Minister said Uddhav Thackeray | काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो: उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संयुक्त मेळावा शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मविआने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबविण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, असे जाहीर केले.  

ठाकरे म्हणाले, आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. 

महायुती सरकार घाबरणारे सरकार आहे, अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर १५०० रुपयांत बहिणींचे प्रेम विकत घेऊ शकत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधत गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नसल्याचा हल्लाबोल केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेत भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. 

जागा वाटपावरून भांडण नको जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राला कंगाल करण्याचा भाजपचा प्रयत्न: पटोले  दिल्लीत बसलेले भाजपचे नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभेत त्यांचे हे एटीएम बंद करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

संविधानावरील संकट अजूनही कायम: पवार

संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर इथले सरकार बदलण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी केले.

पवार म्हणाले, महाराष्ट्राची उद्याची दिशा काय राहणार? महाराष्ट्रावर जे संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे पोहोचविण्यासाठी ही सभा आहे. महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. मात्र, देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. कारण त्यांच्या विचारधारेला संविधानाची अडचण झाली आहे. 

Web Title: I will support if Congress, NCP announce the face of Chief Minister said Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.