"उद्धव काकांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करेन", राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 04:05 PM2022-10-08T16:05:35+5:302022-10-08T16:06:31+5:30
Jaydeep Thackeray : उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करीन, असे जयदीप ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर दावा केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. हे दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे दसरा मेळावे पार पडले. यावरून दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते. तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात जयदेव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे उपस्थित होते. यावरुन ठाकरे कुटुंबात दुरावा वाढल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी मराठी वृत्तवाहिनी 'साम'शी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी दिली तर पक्षासाठी काम करीन, असे जयदीप ठाकरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "मी बाळासाहेबांचा मोठा नातू, त्या नात्याने जबाबदारी पार पाडत आहे. खरी शिवसेना कोणाची हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेत दोन गट पडतील, असे कधीच वाटले नव्हते. कोरोना काळात काका स्वतः आजारी असताना त्यांनी खूप चांगल काम केले आहे."
याचबरोबर, "मी आतापर्यंत दसरा मेळाव्याबद्दल ऐकत होतो, पण यावर्षी गेलो आणि अनुभव घेतला. उद्धव काकांनी संधी दिली तर मी नक्की राजकारणात येईन. बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही. मी बाळासाहेबांचा मोठा नातू म्हणून उद्धव काकांच्या दसरा मेळाव्यात गेलो होतो. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडत आहे", असेही जयदीप ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्याचे राजकीय वातावरण पाहता राज्याच्या राजकारणात आणखी एक ठाकरे येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.