...तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, धर्मा पाटलांच्या पुत्राचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 03:07 PM2018-01-25T15:07:00+5:302018-01-25T15:16:26+5:30
खासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.
मुंबई- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. जर सरकारने योग्य मदत दिली नाही तर बापाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिलाय.
दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राचं धोरण मूठभर धनदांडग्यांच्या गल्ला भरणारे आणि शेतकर्यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्यांची फसवणूक करते आहे. धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तो मंत्री असल्याने तात्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटील सारख्या कोणताही वशिला अन् राजाश्रय नसलेल्या शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, ही परिस्थिती या सरकारने आज राज्यात निर्माण केली आहे.
धर्मा पाटील यांना सरकारने अत्यल्प मोबदला देण्यासंदर्भात विखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांंची कमी पैशात बोळवण करण्याचा प्रयत्न करते आहे. सरकारी दलालांमार्फत येणार्या शेतकर्यांना योग्य किंमत मिळते. पण दलालाच्या तुंबड्या न भरणाऱ्या शेतकर्यांवर जीव देण्याची वेळ येते, यातून हे सरकार नेमका काय संदेश देते आहे? आता धर्मा पाटलांनी विष घेतल्यावर सरकार अनुदान देण्याच्या घोषणा करते. मग हे शहाणपण आधीच का नाही सूचले? शेतकर्यांना सरकारी अनुदानाची भीक नको, आपल्या जमिनीची योग्य किंमत हवी आहे. धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकर्याला न्याय का नाकारला गेला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.
राजू शेट्टींनी घेतली धर्मा पाटलांची भेट
खासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे, असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.
धर्मा पाटील यांना 200 गुंठे बागायती शेतीसाठी 4 लाख रुपये नुकसानभरपाई सरकारनं देऊ केली. मात्र दुसरीकडे त्याच गटातील 74 गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला 1 कोटी 89 लाख रुपये भरपाई मिळते आहे, सरकार असा दुजाभाव का करतंय. ऊर्जामंत्री बावनकुळेंनी हा कोणता नवा जावईशोध लावलाय, असा सवाल उपस्थित करत खासदार राजू शेट्टी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने देऊ केलेली 15 लाखांची मदत नाकारली आहे.