आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो...; महायुतीवर एकनाथ शिंदेंची खंत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:11 PM2024-06-19T21:11:50+5:302024-06-19T21:12:39+5:30
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेनेचे १९ टक्के मतदार होते, त्यापैकी १४.५ टक्के मतदार हे आमच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मते तिकडे राहिली. मग इतर मते कशी आली, कुठून आली, उमेदवार कसे जिंकले हे महाराष्ट्राला माहिती. ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती उतरते पण, असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला.
बाळासाहेबांनी वाढविलेली शिवसेना कोकणात, मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढली. लोकसभेला ठाणे पडेल, कल्याण पडेल असे सांगितले गेले. परंतू ज्या कोकणात शिवसेना फोफावली त्याठिकाणी त्यांची एकही जागा आली नाही. आम्ही घासूनपुसून नाही ठासून विजय मिळविल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
श्रीकांत चार लाखांनी गेला होता, एक पेटी आली अन्...; एकनाथ शिंदेंनी सांगितला मतमोजणीवेळचा किस्सा
शिवसेना वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शिंदे यांनी महायुतीतील दगाबाजी आणि उद्धव ठाकरेंविरोधात भाष्य केले. दोन वर्षांपूर्वी आपण जो उठाव केला, आज लोकसभेच्या निमित्ताने जनतेने शिक्कामोर्तब करून दाखविले. हा निर्णय कसा योग्य होता हे दाखविले. मतदारांचा विश्वास मी तडा जाऊ देणार नाही. बाळासाहेबांनी आज असते तर म्हटले असते जमलेल्या तमाम हिंदू बांधव भगिणींनो, परंतू त्यांचे वारसाचा हक्क सांगणारे हे बोलू शकले नाहीत. त्यांनी शिवतीर्थावर धाडस केले नाही. कसले हिंदुत्व आहे, बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यांचा फोटो लावण्याचा अधिकारही राहिला नाही, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
धनुष्यबाण पेलण्याची हिंमत मनगटात लागते, ते आपल्या शिवसेनेचे आहे. म्हणून धनुष्यबाणाला लोकांनी मतदान केले. एवढी कसली लाचारी. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. लोकसभेच्या आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. आपण का जागा हरलो ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात जाऊ इच्छित नाही. महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायाची आहे. या महायुतीत मी मुख्यमंत्री आहे. म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे. ही जबाबदारी मी पार पाडेन याचा विश्वास मी देतो. या वावटळीमध्ये शिवसेनेचा मुळ जो आधार आहे जो मतदार आहे तो दुसरीकडे गेला नाही. आपल्याकडे वळला, याचे उदाहरण शिवसेनेचे १९ टक्के मतदार होते, त्यापैकी १४.५ टक्के मतदार हे आमच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मते तिकडे राहिली. मग इतर मते कशी आली, कुठून आली, उमेदवार कसे जिंकले हे महाराष्ट्राला माहिती. ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती उतरते पण, असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला.
शिंदे संपणार असे काही जण म्हणत होते, मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. शिंदे संपला नाही, जिंकला तुमच्यासाठी, असेही शिंदे म्हणाले. ठाणे हा आनंद दिघे, एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. कल्याणमध्ये तर मी एकदाच गेलो. त्यांना म्हणालो तुम्ही बाकीचा मतदारसंघ फिरा, मला एकदा येऊद्या. श्रीकांतला उमेदवार म्हणून २०१४ ला कोणी ओळखत नव्हते. त्याने त्याची ओळख निर्माण केली. चार लाखांनी गेला होता. एक पेटी आली आणि त्यांचा लीड दीड लाखाने घसकन खाली झाला, असे शिंदे म्हणाले.