आयएएस अधिकारी मनीषा व मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:16 AM2017-07-18T11:16:13+5:302017-07-18T13:22:01+5:30
राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - राज्यातील ज्येष्ठ आयएएस अधिकारी मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केली आहे. मन्मथ म्हैसकर असे मुलाचे नाव आहे. मलबार हिलमधील इमारतीवरुन उडी मारुन मन्मथने आत्महत्या केली. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत तर, मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय मन्मथ म्हैसकर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्राला भेटायचं असल्याचं सांगून घराबाहेर पडला होता. साडे सात वाजण्याच्या सुमारास मन्मथने मलबार हिलमधील दरिया महल इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र मन्मथचा जागीच मृत्यू झाला होता. मलबार हिल पोलिसांनी पोस्टमॉर्टमकरिता मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मलबार हिल पोलिसांनी चौकशीसाठी दोन मित्रांना ताब्यात घेतलं आहे.
हत्या, आत्महत्या की अपघात ?
मन्मथ म्हैसकर आपला मित्र अग्रवाल याच्या घरी जातोय असं सांगून सकाळी सात वाजता घराबाहेर पडला होता. मात्र साडे सात वाजण्याच्या सुमारास त्याने उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. पण पोलिसांनी त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं असल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आता ही नेमकी आत्महत्या होती, हत्या की अपघात यादृष्टीने तपास सुरु आहे.