बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 07:28 PM2024-08-21T19:28:29+5:302024-08-21T19:48:07+5:30

बिहारमध्ये आंदोलनादरम्यान आयएएस अधिकारी श्रीकांत खांडेकर यांना पोलिसांकडून चुकून मारहाण करण्यात आली.

IAS officer Shrikant Khandekar was mistakenly beaten by the police during the agitation in Bihar | बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर

बिहारमध्ये मराठी IAS अधिकाऱ्यावर लाठीचार्ज; कोण आहेत सोलापूरचे श्रीकांत खांडेकर

Who is IAS Shrikant Kundlik Khandekar: अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरुन बुधवारी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यावेळी देशाच्या विविध भागात आंदोलकांनी जोरदार आंदोलन केलं. मात्र आरक्षणाबाबत सुरु असलेल्या भारत बंद आंदोलनादरम्यान बिहारमध्ये  गदारोळ झाला. बिहारची राजधानी पाटण्यात आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. बिहार पोलिसांनी आंदोलकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर लाठीमार केला. आंदोनकांना पांगवताना पोलिसांनी पाटण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरही लाठीचार्ज केला. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला. हवालादराची चूक लक्षात येताच इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि जिल्हाधिकाऱ्याला पुढे लाठ्या खाण्यापासून वाचवलं. महत्त्वाची बाब म्हणजे हे जिल्हाधिकारी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आरक्षणामध्ये क्रिमी लेयर लागू करण्याच्या परवानगीच्या विरोधात विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी १४ तासांच्या भारत बंदची हाक दिली होती. अनेक राज्यांमध्ये बंदचा परिणाम दिसून आला. काही ठिकाणी आंदोलकांनी हिंसक निदर्शनेही केली. बिहारची राजधानी पाटणामध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठमोळे जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. मात्र यावेळी त्यांना पोलिसांच्या लाठीचार्जला सामोरे जावे लागले.

श्रीकांत खांडेकर यांच्यावर लाठीचार्ज

पाटण्यात आंदोलकांना शांत करताना जिल्हाधिकारी श्रीकांत खांडेकर यांच्यावर एका हवालदाराने चुकून लाठीचार्ज केला. हल्लेखोरांना शांत करत असताना काही पोलिसांनी श्रीकांत यांना सामान्य नागरिक समजून लाठीने मारहाण केली. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे जिल्हाधिकारी आहेत हे ओळखले. त्यांनी तत्काळ त्या हवालदाराला रोखलं आणि त्यांच्याबद्दल माहिती दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोण आहेत श्रीकांत खांडेकर?

व्हायरल व्हिडीओमुळे श्रीकांत खांडेकर हे चर्चेत आले आहेत.  श्रीकांत खांडेकर हे २०२० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सहाय्यक जिल्हाधिकारी  या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पाटणा येथे जिल्हाधिकारी म्हणून झाली. श्रीकांत हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचा जिल्ह्यातील बावची गावातील आहेत. श्रीकांत खांडेकर यांनी दापोली कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससीमध्ये यशस्वी झाला होते. संपूर्ण देशातून श्रीकांत यांचा वनसेवा परीक्षेत ३३ वा क्रमांक आला होता.

श्रीकांत खांडेकर यांचे वडील हे शेतकरी आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी वडील कुंडलिक खांडेकर यांनी तीन एकर जमीन विकली होती.  कुंडलिक खांडेकर यांनी आपल्या तीन मुलांना मोलमजुरी करुन शिक्षीत केले. श्रीकांत यांची आयआयटीमध्ये निवड झाली पण त्याने यूपीएससीची तयारी केली आणि १८ महिन्यांच्या तयारीनंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले.

दरम्यान, बारावीत असताना श्रीकांत खांडेकर यांनी राज मित्र नावाचे पुस्तक वाचले होते, ज्यात नागरी सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनेक कथा होत्या आणि त्यापैकी बरेचसे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय होते. त्यानंतर बारावीतच श्रीकांत यांनी आपल्याला आयएएस व्हायचे आहे असं ठरवलं होतं.
 

Web Title: IAS officer Shrikant Khandekar was mistakenly beaten by the police during the agitation in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.