Pooja Khedkar: लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून...; अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी पूजा खेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:50 PM2024-07-31T12:50:10+5:302024-07-31T13:02:54+5:30

Pooja Khedkar Latest News: पोलिसांनी नाही, युपीएससीने चौकशी करावी; पूजा खेडकरच्या वकिलांचा दिल्ली कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी युक्तीवाद

IAS Pooja Khedkar Delhi Court Hearing: All this is being done because sexual harassment has been reported; Puja Khedkar's allegation at the anticipatory bail hearing | Pooja Khedkar: लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून...; अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी पूजा खेडकरांचा आरोप

Pooja Khedkar: लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून...; अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी पूजा खेडकरांचा आरोप

आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी सुरु झाली आहे. यामध्ये युपीएससीने अधिकारी म्हणून काही संरक्षण दिलेले असते. यानुसार पोलिसांनी माझी चौकशी करू नये तर युपीएससीने करावी अशी मागणी करत अटकेला खेडकर यांनी विरोध केला आहे. तसेच आपण ४७ टक्के अपंग असल्याचेही एम्सचे प्रमाणपत्र कोर्टासमोर सादर करत नियमातच भरती झाल्याचा दावा केला आहे. 

खेडकर यांच्या वकील वीणा माधवन यांनी खेडकर यांची बाजू मांडली आहे. पूजा खेडकर यांना उच्च न्यायालयाने मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याची परवानगी दिल्याचा दावा केला आहे. यावर कोर्टाने माधवन यांना कोर्टाचे आदेश सादर करण्याची विचारणा केली आहे. युपीएससीने खेडकर यांनी तीन जादाचे प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. तुम्ही म्हणताय की हायकोर्टाने तुम्हाला त्याची परवानगी दिली आहे, ती सादर करावी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डीके जंगला यांनी म्हटले आहे. यावर युपीएससीच्या वकिलांनी खेडकर या अतिरिक्त परीक्षा देण्यास पात्र आहे असा उच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय नव्हता, असे म्हटले आहे. 

वैद्यकीय मंडळाने पूजा खेडकर ही एकापेक्षा जास्त अपंगत्व असलेली उमेदवार असल्याचे म्हटलेले आहे. तिला कायमस्वरूपी बेंचमार्क अपंगत्व आहे. तिच्या संपूर्ण शरीरात 47% अपंगत्व आहे. याचे प्रमाणपत्र एम्सने दिलेले आहे, मग ही फसवणूक कशी म्हणता येईल असा युक्तीवाद खेडकरच्या वकिलांनी केला. युपीएससीने दोषी हा शब्द वापरला आहे. आम्हाला फक्त नोटीस आलेली आहे. फौजदारी खटला दाखल करण्यात युपीएससीला एवढी घाई का झाली? मला माझी बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती. फौजदारी खटला आणि अटकेच्या भीतीमुळे मी माझी बाजू मांडू शकत नाही, असा युक्तीवाद खेडकर यांच्या वकिलांनी केला. माझी बाजू मांडण्यासाठी मला अटकपूर्व जामीन हवा आहे, असे वकिलांनी कोर्टाला सांगितले. 

खेडकर यांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे आणि म्हणूनच हे सर्व तिच्याविरुद्ध केले जात आहे, असाही गंभीर आरोप खेडकर यांच्या वकिलांनी केला आहे. माझा व्यवस्थेवर आणि न्यायालयांवर विश्वास आहे, असे खेडकर म्हणाल्या. युपीएससीने दोषी ठरविल्यासच पोलिसांकरवी चौकशी करावी अशी मागणी देखील खेडकर यांनी न्यायालयात केली आहे. 
 

Web Title: IAS Pooja Khedkar Delhi Court Hearing: All this is being done because sexual harassment has been reported; Puja Khedkar's allegation at the anticipatory bail hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.