पिस्तुल दाखवले मुळशीत अन् २५० किमीवरील खेडकरांचे गाववाले करतायत हल्ल्याच्या प्रयत्नाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 08:48 AM2024-07-18T08:48:03+5:302024-07-18T08:48:49+5:30
Manorama Khedkar NEWS: घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीमुळे अख्खे खेडकर कुटुंबाचे कारनामे जगजाहीर होऊ लागले आहेत. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्यावर आता पोलीस कारवाई बाकी आहे. पुण्यातील मुळशीमध्ये मनोरमा यांनी शेतकऱ्यांवर पिस्तुल उगारून त्यांना दमदाटी केली होती. जमीन हडप करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला असून मनोरमा यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे असताना घटना मुळशीची आणि पार अगदी २५० किमीवर असलेल्या खेडकरांच्या गावकऱ्यांनी मनोरमा यांच्यावर मुळशीत गुंडांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मनोरमा खेडकर यांचे अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये भालगाव नावाचे मूळ गाव आहे. या गावाने मनोरमा यांच्या पिस्तुल दाखवत दमदाटी केल्या प्रकरणावर मनोरमा यांना पाठिंबा दिला आहे. यासाठी त्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी व पोलिसांना निवेदन दिले आहे. यामध्ये 5 जून 2023 रोजी दुपारी मुळशी परिसरातील काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी काठ्या, धारदार हत्यार घेऊन मनोरमा खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. 20 मिनिटे हा राडा सुरु होता. तेव्हा आपला जीव वाचविण्यासाठी मनोरमा यांनी पिस्तुल काढल्याचे या गावकऱ्यांनी म्हटले आहे. मनोरमा या आमच्या गावच्या सरपंच होत्या तेव्हा त्यांनी गावाचा कायपालट केल्याचेही हे गावकरी समर्थनार्थ सांगत आहेत.
तसेच मुळशी प्रकरणी एकच बाजू दाखवण्यात येत असून खरी बाजू लपविली जात आहे. खेडकरांची नाहक बदनामी सुरु आहे. खेडकरांनी पिस्तुल काढले तेव्हा जमाव बाजुला झाल्याचा दावा या गावकऱ्यांनी केला आहे. तसेच बदनामी थांबविली नाही तर मुंबईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी गावाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणत आहेत.
आता पर्यंत खेडकरांचे काय काय प्रकार समोर आले?
खरेतर मुळशीपासून खेडकरांचे अहमदनगरला असलेले गाव हे सुमारे २५० किमी दूर आहे. पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पिस्तूलचे लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. हे लायसन रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटी, बनावट कागदपत्रे देऊन आयएएस नोकरी हडपलेली आहे. एसीबीने दिलीप खेडकर यांच्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. यात आता आयकर विभागानेही लक्ष घातले असून ते देखील चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांच्यावर प्रशिक्षण रद्दची कारवाई करण्यात आली आहे. या आठवडाभरात त्यांना मसुरीला हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. यातच मनोरमा यांचा पोलिसांशी मेट्रोच्या कामावरून हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने मनोरमा यांच्या बाणेरच्या बंगल्याच्या समोरील फुटपाथवरील अतिक्रमण तोडले आहे.