पूजा खेडकरला खोलीत बोलावले का? "तिच्याशी तीन वेळा भेट झाली पण..." आरोपांवर पुणे जिल्हाधिकारी बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:00 AM2024-08-01T11:00:03+5:302024-08-01T11:00:58+5:30
IAS Pooja Khedkar news: कोर्टात सुनावणीवेळी खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली आहे.
वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचे आयएएस पद युपीएससीने रद्द केले आहे आणि आजिवन परीक्षा देण्यास बंदी घातली आहे. पूजा खेडकर यांना लवकरच अटक होण्याची देखील शक्यता आहे. असे असताना अटकपूर्व जामिनासाठी खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टात अर्ज केला आहे. या सुनावणीवेळी खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांचे हे आरोप खोडून काढले आहेत. दिवसे यांनी मला खोलीत बोलावले होते, परंतु मी नकार दिला, असा दावा पूजा खेडकरने केला होता. यावर दिवसे यांनी सांगितले की, पूजा हिने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व आरोप रचलेले आहेत. खेडकर या ३ ते १४ जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधीत होत्या. यावेळी पूजा खेडकर यांना मोजून तीनवेळा भेटलो. या सर्व भेटी प्रशासकीय होत्या. यावेळी अन्य अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते, असे दिवसे म्हणाले.
या काळात कधीही मी पूजा यांना एकटा असताना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी एकटा असताना चर्चा केली नाही. १४ जूननंतर त्यांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले, तिथे पोस्टिंग होताना पूजाने कोणताही आरोप केला नाही. राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात, माझ्या पत्राच्या उत्तरात तिने असा कोणताही आरोप केलेला नाही. जेव्हा तिला वाशिमला पाठविण्यात आले तेव्हा तिने जाणूनबुजून आशा प्रकारचे आरोप केले आहेत. तिने असे का केले हे सर्व जाणत आहेत, असेही दिवसे यांनी स्पष्ट केले.
पूजा खेडकर हिच्या चमकोगिरीवरून आवाज उठल्यावर तिची बदली वाशिमला करण्यात आली होती. तिथे बनावट प्रमाणपत्रे, नाव बदलून युपीएससी परीक्षा देणे, वडिलांची अवैध संपत्ती आदी गोष्टी विरोधात जात असल्याचे पाहून दिवसे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. युपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. यामुळे ती वाशिममधून बेपत्ता झाली आहे. तिचे वकील दिल्लीतील न्यायालयात तिला अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.