‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन)’ कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन
By admin | Published: March 19, 2016 01:53 AM2016-03-19T01:53:49+5:302016-03-19T01:53:49+5:30
पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (शनिवारी) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार
पुणे : पुण्यातील विविध क्षेत्रांतील कर्तबगार महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमन)’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन उद्या (शनिवारी) ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात आपले स्थान उंचावणाऱ्या महिलांच्या स्फूर्तिदायक यशोगाथेला अक्षर सलाम करणाऱ्या या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनाला खासदार वंदना चव्हाण, अमर साबळे, अनिल शिरोळे, संजय काकडे ग्रुपच्या उपाध्यक्षा उषा काकडे, प्रख्यात लेखिका शोभा डे, अनिल काटे एंटरप्रायझेसचे संचालक अनिल काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील नारीशक्तीला ‘लोकमत’ने नेहमीच भरभक्कम पाठिंबा दिला आहे. महिलांच्या जीवनोन्मुखतेने त्यांच्या कर्तबगारीला नेहमीच वेगळा आयाम दिलेला आहे. याचेच प्रत्यंतर हे कॉफीटेबल बुक वाचताना येईल.
राज्य पातळीवरील तेजस्विनींचा सन्मान
दोन वर्षांपासून ‘लोकमत’ने ‘वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ सुरू केले आहेत. असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या तेजस्विनींचा जागर संपूर्ण राज्यभर व्हावा व त्यांच्या कार्यातून महिलांना उमेद मिळावी, हाच यामागचा उद्देश आहे.
‘लोकमत’च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्वशालिनींचा राज्य पातळीवरील ‘लोकमत सखी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कला, शौर्य, क्रीडा आणि उद्योग या क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.