आयकॉन्स हे तरुणाईसाठी प्रेरणादायी
By Admin | Published: June 27, 2016 01:10 AM2016-06-27T01:10:48+5:302016-06-27T01:10:48+5:30
ज्ञानाला लाचारीची जोड न देता ज्या व्यावसायिकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समृद्धीचे इंद्रमहाल उभे केले आहेत.
पुणे : ज्ञानाला लाचारीची जोड न देता ज्या व्यावसायिकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समृद्धीचे इंद्रमहाल उभे केले आहेत. ज्ञानाला श्रमाची जोड देत त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. यातून तरुण पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.
‘लोकमत समूहा’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पुणे’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘व्यावसायिक आणि उद्योजकांनी शुन्यातून विश्व निर्माण केले; मात्र प्रसिद्धीचा, पैशांचा हव्यास बाळगून परदेशात झेपाविण्याचे स्वप्न न पाहता, त्यांनी आपल्या देशात राहून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला. या ‘आयकॉन्स’नी युवा पिढीसाठी चिरंतन कार्य केले पाहिजे. संस्कृती शिकवता येत नाही, ती ग्रहण करावी लागते. ती टिकविण्यासाठी, घडविण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. या संस्कृतीचा वारसा आपण नव्या पिढीला योग्य प्रकारे शिकविला पाहिजे.
यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिकांचे कौतुक करताना निकम म्हणाले, ‘व्यवसाय उभा करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या संकटांवर मात करून पुढे वाटचाल करण्याचा आनंद काही वेगळाच असतो.’ युवा पिढीबाबत स्पष्ट भाष्य करताना
ते म्हणाले, ‘आजकाल पालकांमुळे तरुणही टीव्हीकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे त्यांची विचारशक्ती, तर्कबुद्धी क्षीण होत चालली आहे. या प्रवाहात तरुणाई वाहवत चालली आहे. अशा वेळी, या तरुणांना योग्य दिशा दाखविण्याचे, त्यांना घडविण्याचे काम ‘आयकॉन्स’चे आहे. त्यांच्याकडूनच तरुणांना खरी प्रेरणा मिळेल.
‘सध्या देश ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचवेळी देशासमोर इतर अनेक आव्हाने ‘आ’ वासून उभी आहेत. या आव्हानांवर मात करीत, यशस्वी वाटचाल करीत भविष्यातील भारत घडवावा लागेल’, असेही ते म्हणाले.
>‘लोकमत’ने जपली बांधिलकी : खऱ्या हिऱ्यांचा गौरव
‘प्रोफेशनल आयकॉन्स आॅफ पुणे’ या कॉफीटेबल बुकच्या माध्यमातून ‘लोकमत’ने हिरे, हिरकणींचा सन्मान केला आहे. सखोल संशोधन करून व्यावसायिकांची चोखंदळ निवड करून, ‘लोकमत’ने एखाद्या जवाहिऱ्यासारखे उत्कृष्ट काम केले आहे.
पत्रकारिता या धर्माचा धंदा होऊ न देता लोकमतने सामाजिक बांधिलकी जपली आहे, याचे मला कौतुक वाटते, असे अॅड़ उज्ज्वल निकम म्हणाले.