आयसीएसई विद्यार्थ्यांना आता ‘योग’सक्ती!
By Admin | Published: June 9, 2017 05:12 AM2017-06-09T05:12:11+5:302017-06-09T05:12:11+5:30
(आयसीएसई) बोर्डातील पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात ‘योग’ या नव्या विषयाचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून केला जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंडियन सर्टिफिकेट आॅफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) बोर्डातील पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात ‘योग’ या नव्या विषयाचा समावेश पुढील शैक्षणिक वर्षापासून केला जाणार आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरी अराथून यांनी कोलकाता येथे बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
योगसह संस्कृत आणि परफॉर्मिंग आर्ट या दोन नव्या विषयांचा समावेश २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात करण्यात येईल. हे तीनही विषय विद्यार्थ्यांना सक्तीचे असतील. त्यातील योग आणि परफॉर्मिंग आर्ट हे दोन्ही विषय पहिली ते आठवीसाठी, तर संस्कृत हा पाचवी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सक्तीचा असेल. दरम्यान, पाचवी आणि आठवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल, असे अराथून यांनी सांगितले. मात्र या परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्यांना पास किंवा नापास केले जाणार नाही. ही केवळ नेहमीप्रमाणेच मूल्यमापन चाचणी असेल. त्यातून विद्यार्थ्यांच्या सद्य:स्थितीच्या प्रगतीविषयी माहिती मिळवता येईल.
यंदा जरी हे विषय सक्तीचे नसले, तरी पुढील शैक्षणिक वर्षापासून हे तीन नवे विषय सक्तीचे होणार आहेत. याआधीच शाळेत सूर्यनमस्कार सक्ती केल्यावरून देशात चांगलेच राजकारण तापले होते. त्यात योगाच्या सक्तीवरून अद्याप जरी वाद झाला नसला, तरी भविष्यात या मुद्द्यावरून राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.