आयसीटीमध्ये वादंग!
By Admin | Published: July 8, 2015 12:51 AM2015-07-08T00:51:46+5:302015-07-08T00:51:46+5:30
माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत (आयसीटी) प्रवेश करण्याच्या वादावरून मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ आणि संस्था कुलगुरू जी.डी. यादव यांच्यात मंगळवारी वादंग निर्माण झाला.
मुंबई : माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत (आयसीटी) प्रवेश करण्याच्या वादावरून मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघ आणि संस्था कुलगुरू जी.डी. यादव यांच्यात मंगळवारी वादंग निर्माण झाला. परिणामी संस्था आवाराला पोलीस छावणीचे रूप आले होते.
वांद्रे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशावरून संस्थेत प्रवेश करत असल्याचा दावा कर्मचारी संघाचे सरचिटणीस रूपेश मालुसरे यांनी केला. मालुसरे म्हणाले की, औद्योगिक न्यायालयाने दोन वेळा कर्मचारी संघाला संस्थेत प्रवेश करण्यास परवानगी दिली आहे. मात्र कुलगुरू मनमानी करत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारत आहेत. गुरुवारी मुंबई विद्यापीठ कर्मचारी सहकारी संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी संघाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठरल्याप्रमाणे आजही कुलगुरूंनी बळाचा वापर करून प्रवेश नाकारला.
यासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसतानाही पोलिसांनी कुलगुरूंविरोधात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा कर्मचारी संघाचा आरोप आहे. गेल्या १५ दिवसांत कुलगुरूंविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात संघाने हा तिसरा गुन्हा दाखल केला आहे. तरीही कर्मचारी संघाला संस्थेत प्रवेश मिळालेला नाही.
यावरून पोलीस प्रशासनावर दबाव असल्याचा आरोप संघाने केला आहे. परिणामी कुलगुरूंविरोधात औद्योगिक न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय कर्मचारी संघाने घेतला आहे. (प्रतिनिधी)