''हिंदुत्वाची कल्पना ही ब्राह्मणकेंद्री''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:08 AM2019-12-16T06:08:49+5:302019-12-16T06:16:57+5:30
आनंद करंदीकर : समाजवादी कार्यकर्ता संमेलनाचा समारोप
संगमनेर (जि. अहमदनगर) : हिंदुत्वाची कल्पना ही ब्राह्मणकेंद्री आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजही पुरूषसत्ताकपद्धती असून महिलांना तेथे स्थान नाही. त्यांची संस्कृती महिलांना दुय्यम स्थान देणारी आहे, असे मत डॉ. आनंद करंदीकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेरमध्ये दोन दिवसीय समाजवादी कार्यकर्ता संमेलनाचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ‘राष्ट्रवाद’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ज्ञ प्रा. हरजिंदर सिंह (कवी लालटू) होते. व्यासपीठावर राष्ट्रसेवा दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष गोपाळ नेवे, माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक उपस्थित होते.
डॉ. करंदीकर म्हणाले, गोमांस खात नाहीत ते राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचा पाठपुरावा न करणारे राष्ट्रविरोधी असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. सध्या हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व झाले आहे. बाहेरून हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादाची कल्पना निर्माण झाली. एका कालखंडात ती जन्माला आली. ती स्थिरावण्याच्या आधीच भारतीय विचारवंतांनी ही कल्पना टाकाऊ असल्याचे सांगितले होते.
एनआरसी नोंदणीला विरोध करण्याचा ठराव समाजवादी कार्यकर्ता संमेलनात चार ठराव मांडण्यात आले.
नागरिक दुरूस्ती विधेयकात धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यात आला असल्याने हा संविधानाला मोडीत काढण्याचा डाव आहे. राष्ट्र सेवा दलाचे सर्व सैनिक या विधेयकानुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी स्वत:ची माहिती देणार नाहीत आणि एनआरसी (राष्ट्रीय नागरिक रजिस्टर) नोंदणीला विरोध करणार आहेत.
केंद्र आणि राज्य सरकार यांनी स्त्री सुरक्षेसाठी योग्य ती सर्व जरूरीची पाऊले उचलावीत आणि स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर, कठोर असावे. सर्व कायद्यांची अंमलबजावणी व्हावी. शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर सरकारने योग्य ती तत्परता दाखवावी, शिक्षणाचा सर्वांना हक्क मिळावा. पुढील समाजवादी संमेलन साने गुरूजी यांची कर्मभूमी जळगाव जिल्ह्यात घेण्यात यावे, असे ठराव मंजूर करण्यात
आले.