इसिसचे विचार हे निव्वळ भ्रामक
By Admin | Published: March 26, 2016 12:25 AM2016-03-26T00:25:46+5:302016-03-26T00:25:46+5:30
जिहादी जॉनमुळे ते प्रभावित झाले होते. ब्रिटनच्या अबू बाराबाबत त्यांना आकर्षण होते, तर सीरियात असद यांच्याकडून जे बॉम्बहल्ले सुरू आहेत त्याबद्दल प्रचंड द्वेषही मनात होता.
- डिप्पी वांकाणी, मुंबई
जिहादी जॉनमुळे ते प्रभावित झाले होते. ब्रिटनच्या अबू बाराबाबत त्यांना आकर्षण होते, तर सीरियात असद यांच्याकडून जे बॉम्बहल्ले सुरू आहेत त्याबद्दल प्रचंड द्वेषही मनात होता. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी त्या दोन तरुणांनी आपल्या कुटुंबाला सोडून दिले; पण घर सोडून गेल्यानंतर आपल्याबद्दलची चर्चा मीडियातून त्यांना समजली आणि ते परत आले. हे आहेत इसिसच्या मार्गावरून परत आलेले वाजिद शेख आणि नूर मोहम्मद. अर्थात, त्यांच्यात खूप बदलही झाला आहे.
मालवणीच्या या दोन तरुणांची प्रथमच ‘लोकमत’ने मुलाखत घेतली. महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकानेही या तरुणांना चांगले सल्ले दिले, तर समुदायातील नेत्यांनीही या दोघांची समजूत घातली. त्यानंतर इसिसची विचारधारा ही भ्रामक आहे, हे दोघांना पटले. १५ डिसेंबर रोजी लिंबू विक्रेता शेख (२५), मिस्त्री काम करणारा नूर मोहम्मद (३२) आणि आॅटोरिक्षाचालक मोहसिन चौधरी (३०) हे तिघे गायब झाले. त्यानंतर शेखची पत्नी फातिमा हिने लेखी तक्रार दिली की, शेख हा इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेला आहे. या दोघांचेही छायाचित्र मीडियातून प्रकाशित झाले, तर त्यांचा चौथा साथीदार कॉल सेंटरचा कर्मचारी अयाज सुल्तान हा गतवर्षी ३० आॅक्टोबर रोजीच गायब झालेला आहे. तो काबूलमध्ये पळाला असून, इसिसमध्ये सहभागी झाला आहे, असे सांगण्यात येते.
वाजिद शेख हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. तो मालवणीत लिंबू विक्रीचा व्यवसाय करीत होता. घरी पत्नी आणि कुटुंंबीय आहेत. ते आता मालवणीतच नव्या भागात राहायला गेले आहेत. दरमहा ८ हजार रुपये भाड्याने त्यांनी एक घर घेतले असून, तेथे वाजिद शेख एका पलंगावर बसला होता. तो म्हणाला, आम्ही मस्जिदीत नमाजसाठी जात असू, तेव्हा मोहसिन आणि अयाज व्हिडीओ बघत असत. सीरियात बॉम्बहल्ले करून तेथील सरकार मुस्लिमांवर अत्याचार करत आहे हे ते सांगत. आम्ही जिहादी जॉनचेही व्हिडीओ पाहिले. यात तो कशा प्रकारे विदेशी नागरिकांना मृत्युदंड देत होता हे दिसत होते.
तथापि, मस्जिदीमध्ये मौलाना हे इसिसच्या विरुद्ध बोलत असत. आम्हाला अबू बाराचा उपदेश ऐकण्यास सांगितले जात असे. त्यावर फातिमा म्हणाली की, शेखने घरातून जाण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही. माझ्या नातेवाइकांनी मला असे सांगितले की, जर फक्त हरवल्याची तक्रार दिली तर पोलीस गांभीर्याने शोध घेणार नाहीत. त्यामुळे पती इसिसच्या मार्गावर गेल्याची तक्रार मी दिली.
इसिसच्या मार्गावर तू का गेलास, असा प्रश्न केला असता वाजिद म्हणाला की, आम्हाला वाटले की, जगभरातील मुस्लीम या युद्धात सहभागी होत आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर तर आमची ही धारणा पक्की झाली. पण आता वाटते, मी चुकीचा होतो, तुला वैवाहिक आयुष्यात काही समस्या होत्या का? आणि त्यामुळे तू घरातून बाहेर गेलास का, असा प्रश्न केला असता वाजिद म्हणाला की, नाही. फातिमाशी माझा विवाह होऊन जेमतेम एक वर्ष झाले आहे. घरातून बाहेर गेल्यापासून ते परत येण्याच्या प्रवासाबाबत विचारले असता वाजिद म्हणाला की, आम्ही प्रथम कर्नाटकातील हरिहर येथे गेलो. हे तिकीट मोहसिनने आॅनलाइन बुक केले होते. नूरच्या नातेवाइकांकडे आम्ही तेथे राहिलो. तेथून बसने हैदराबादला गेलो. पुढे रेल्वेने चेन्नईला गेलो. तेथे आम्ही रेल्वे स्थानकाजवळ एका लॉजमध्ये राहिलो.
तो म्हणाला, हॉटेलच्या रूममध्ये टीव्ही पाहत असताना त्यावर आमचे फोटोे दाखविले जात असल्याचे दिसले. त्यामुळे आम्ही गांगरून गेलो. काही समजण्यापूर्वीच मोहसीन पसार झाला होता. त्यानंतर मी आणि नूरने मुंबईला एकएकटे परतण्याचा निर्णय घेतला. मला पुण्यात पकडण्यात आले आणि त्यानंतर एटीएसने २० दिवस चौकशी केली. एटीएसचे अधिकारी खूपच चांगले होते. त्यांनी माझे इसिसबाबतचे गैरसमज दूर करण्यास मदत केली. मी आता माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत आहे. परतल्यानंतर शेजाऱ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. इसिसच्या प्रभावाखाली येऊन मी चूक केली होती; मात्र आता मला योग्य मार्ग मिळाला असून, मी माझ्या वयोगटाच्या युवकांना इसिसची विचारसरणी कशी दिशाभूल करणारी आहे हे समजावून सांगणार आहे.
वाजिदचे वडील बशीर म्हणाले की, त्याने कधी साधा डास मारलेला नाही. त्याला चुकीच्या लोकांची संगत मिळाली. तो आता आमच्यासोबत असल्याने आम्ही आता आनंदात आहोत. नूर मोहंमद (३२) त्याची पत्नी रेहमुन्निसा आणि चार मुलांसोबत राहत आहे. वाजिदपासून विभक्त झाल्यानंतर नूर गुलबर्गा येथील मशिदीत गेला.
तो म्हणाला, तेथे कुराणातील ‘अगर तुमने एक आदमी की जान ली तो सारे इन्सानियत की जान ली और एक आदमी को बचाया तो सारी इन्सानियत को बचाया’ हे वचन वाचल्यानंतर त्याने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. वाजिदप्रमाणेच नूरही मालवणीत चांगल्या घरात राहायला गेला असून, त्यासाठी त्याने एटीएसचे आभार मानले आहेत. एटीएसने केवळ हे घर मिळविण्यासाठीच मदत केली नाही, तर मी रुग्णालयात असताना एक महिन्याचे भाडेही दिले. त्यांनी मला काम मिळावे यासाठी एका स्थानिक ठेकेदाराकडे शब्दही टाकला. त्यामुळे आता मला काम मिळाले असून, मी माझ्या कुटुंबीयांचे पोट भरू शकतो.
नूर म्हणाला की, मोहसीनने आम्हाला मायाजालात अडकवले होते. मोहसीन हा खूप चांगला वक्ता आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या शब्दांना फसलो. मी मोहसीनसोबत राहण्याचा निर्णय का घेतला हे मी आजही सांगू शकत नाही. तो आम्हाला अनेक गोष्टी सांगत असे, तसेच त्याच्या आयफोनवर व्हिडीओ दाखवायचा. त्याचे ऐकून तसेच व्हिडीओ पाहून कोणीही इसिसबरोबर आहे असेच म्हणेल.
या प्रकरणात अयाज आणि मोहसीन यांना आरोपी बनविण्यात आले आहे; मात्र नूर व वाजिद यांना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा तपास गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. नूरला याबाबत सांगण्यात आले असता तो म्हणाला, ‘मैं आपसे पहली बार यह सुन रहा हू. अब क्या होगा मेरा? क्या मेरी फिरसे तेहकिकात होगी? क्या मुझे दिल्ली जाना पडेगा?
भारत आमचा देश तर गौरव व्हायला हवा...
- घरी परतल्यानंतर नूरने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याबाबत विचारले असता तो म्हणाला, मला काहीही आठवत नाही. कृपा करून याबाबत विचारू नका. रात्री दोन बुरखाधारी लोकांनी मला भोसकले आणि त्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले एवढेच काय ते मला आठवते.
- नूर काय सांगतोय हे त्याच्या मुली लक्ष देऊन ऐकत होत्या. त्याची पत्नी त्याच्या सात महिन्यांच्या मुलाला अंगावर पाजत होती. येथील स्थानिक मशिदीत येण्यास मला मज्जाव करण्यात आला असून, मी घरीच नमाज अदा करतो. परतल्यापासून मी वाजिदला भेटलेलो नाही. एटीएस अधिकाऱ्यांनी मला खूप मदत केली. पत्नी व मुलांचे काय होईल याचा जराही विचार न करता मी गेलो ही माझी सर्वांत मोठी चूक होती. एटीएसने आमचे समुपदेशन केले. हा आमचा देश आहे आणि आम्ही त्याचा गौरव वाढवायला हवा,
असेही तो म्हणाला. परतल्यापासून नूर धार्मिक पुस्तके वाचण्यात वेळ व्यतीत करत आहे.
- कुराणातील वचनांचे इसिसने कसे त्याच्या सोयीचे अर्थ लावले हे आता मला कळू लागले आहे. मोहसीन मला एक अरबी गाणे ऐकवायचा. त्याचा अर्थ मला कळत नसे. परंतु चाल आवडे. मी त्याच्या मधाळ वाणीला भुलून माझ्या कुटुंबावर अन्याय केला, असे तो म्हणाला.