पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या परीक्षेत शिथिलता आणण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 06:40 PM2020-03-25T18:40:20+5:302020-03-25T18:48:02+5:30
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठांना व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.
राहुल शिंदे -
पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठांना व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. तसेच विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलाव्या लागणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत शिथिलता आणण्याचा विचार विद्यापीठातर्फे केला जात आहे. मात्र, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.
विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमासाठी क्रेडिट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जात आहे. या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत शिथीलता देता येईल का? याबाबत विद्यापीठ स्तरावर विचार केला जात आहे.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यंत विद्यापीठ स्तरावरील परीक्षा घेणे शक्य नाही. परिणामी विद्यापीठाला सर्व परीक्षांचे वेळापत्रक नव्याने तयार करावे लागणार आहे. परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि पुढील शैक्षणिक वषार्साठी प्रवेश देणे, याबाबतचे वेळापत्रक आता विस्कळित होणार आहे. त्यामुळे द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा घेऊन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत रिलॅक्सेशन देता येईल का ? याबाबत विचार केला जात आहे.
------------------
विद्यापीठातील व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध विषयांचे मार्गदर्शन पर व्हिडिओ तयार केले आहेत. सुमारे दीड हजार व्हिडिओ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आज नाही तर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे व्हिडिओ डाऊनलोड करून घेतले आहेत. विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना इतरही शैक्षणिक साहित्य पुरविले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण येणार नाही.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-