राज्यात ‘आदर्श अंगणवाडी योजना’
By admin | Published: May 23, 2017 01:07 AM2017-05-23T01:07:20+5:302017-05-23T01:07:20+5:30
८५ कोटी खर्च अपेक्षित : पाच हजार अंगणवाड्यांना आदर्श बनविण्याचे उद्दिष्ट
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने ८५ कोटी रुपये खर्चून यंदा ‘आदर्श अंगणवाडी योजना’ राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी ५ हजार अंगणवाड्या आदर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
० ते ६ वयोगटांतील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अंगणवाडीतून प्रयत्न केले जातात. त्याबरोबरच पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण या सेवा अंगणवाडीमार्फत देण्यात येतात. यामधील शिक्षण आनंददायी व्हावे, तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी ‘आदर्श अंगणवाडी योजना’ आखली आहे. ‘आदर्श अंगणवाडी’मध्ये सौरऊर्जा संच, ई-लर्निंग, मुलांसाठी टेबल-खुर्च्या, स्थानिक साहित्यावर आधारित शैक्षणिक साहित्य, स्वच्छ भारत कीट, वीजविरहित वॉटर प्युरिफायर, इलेक्ट्रॉनिक वजन-काटे, उंची मोजण्यासाठीच्या टेप हे साहित्य असेल तसेच इमारत शैक्षणिक मदत केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.
या सर्व सेवा पुरविण्यासाठी एका अंगणवाडीला १ लाख ६५ हजार रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार ५ हजार अंगणवाड्यांसाठी ८४ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी राज्यातील ६८ हजार स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. ६ महसूल विभागांत ५ हजार अंगणवाड्या आदर्श करताना प्रत्येक महसूल विभागात ८३३ अंगणवाड्या आदर्श केल्या जातील. हीच संख्या प्रत्येक जिल्ह्यासाठी १४४ इतकी असेल. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे या योजनेचे सनियंत्रण राहणार असून मूलभूत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातून अंगणवाड्यांची सध्याची स्थिती लक्षात येणार आहे.
यासाठी राज्यस्तरावर सनियंत्रण, मार्गदर्शनासाठी सुकाणू समिती व अंमलबजावणीसाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
अनेक अंगणवाड्यांकडून आधीच निकष पूर्ण
शासनाने आदर्श अंगणवाड्यांची ही योजना जाहीर केली असली तरी आधीच अनेक जिल्ह्यातील अंगणवाड्यांनी आयएसओ प्रमाणपत्रेही घेतली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ४ अंगणवाड्यांनी ही प्रमाणपत्रे घेतली असून जिल्ह्यातील ३०० अंगणवाड्या आयएसओ प्रमाणपत्रासाठी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पारितोषिके
जिल्ह्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या आदर्श अंगणवाड्यांना अनुक्रमे
७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये बक्षीस दिले जाईल तर राज्यातील पहिल्या तीन आदर्श अंगणवाड्यांना १ लाख, ६५ हजार व ३५ हजार याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.