आदिवासी शेतमजुरांचा सामूहिक शेतीचा आदर्श; सक्तीचे स्थलांतर रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:16 AM2018-03-23T00:16:00+5:302018-03-23T00:16:00+5:30
शेतमजूर म्हटले की स्थलांतर हे ओघाने आलेच. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपले गाव सोडून बाहेर जावेच लागते. या सगळ्यात मुलांच्या शाळा सुटतात; महिलांचेही अतोनात हाल होतात. तथापि, कोकणातील माणगावच्या शेतमजुरांनी सामूहिक शेतीचा मार्ग निवडत हे सक्तीचे स्थलांतर रोखले आहे.
- राहुल रनाळकर
मुंबई : शेतमजूर म्हटले की स्थलांतर हे ओघाने आलेच. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपले गाव सोडून बाहेर जावेच लागते. या सगळ्यात मुलांच्या शाळा सुटतात; महिलांचेही अतोनात हाल होतात. तथापि, कोकणातील माणगावच्या शेतमजुरांनी सामूहिक शेतीचा मार्ग निवडत हे सक्तीचे स्थलांतर रोखले आहे. सध्या या शेतमजुरांच्या समूहावर संपूर्ण कोकणातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इंदापूरपासून जवळ असलेल्या निवी मुठवली येथील आदिवासी वाडीवर हा प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. या आदिवासी शेतमजूर कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी मिळून सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. माणगाव येथील सर्वविकास दीप या संस्थेच्या माध्यमातून या आदिवासी शेतमजुरांना दिलेले मार्गदर्शन सामूहिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. तीन वर्षांपासून माणगावमधील काही भूमिहीन शेतकऱ्यांना वर्षभर रोजीरोटी मिळावी, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ज्या जमिनींवर साधारण नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत किंवा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत भात पीक घेतले जाते, त्या जमिनी नंतर मेपर्यंत पिकाविना पडून असतात. अशा जमीन मालकांशी संस्थेच्या पुढाकाराने या शेतमजुरांच्या समूहानं करार केले. त्यानंतर डिसेंबर ते मेपर्यंतच्या काळात या जमिनीवर कारली, कलिंगड, भाज्या अशी उत्पादने घेण्यात आली. गेल्या वर्षी ४ टन कारली तर ३ टन कलिंगडांचे उत्पादन या शेतमजुरांनी घेतले. संस्थेच्या माध्यमातूनच वाशीतील व्यापाºयांशी बोलणी करून उत्पादित झालेला हा माल मुंबईत आणण्यात आला. स्थानिक पातळीवर उपजिविका निर्माण झाल्याने या शेतमजुरांचे स्थलांतर थांबले. मुलांच्या शाळा नियमित राहिल्या; घरातील महिलांचीही ससेहोलपट थांबली. शिवाय संपूर्ण कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळू लागले. रोहा कृषी महाविद्यालयातून मोफत बियाणे मिळवून देण्यात संस्थेला यश आले. या आदिवासी शेतमजुरांच्या बचत गटाने गेल्या वर्षी तब्बल साडेसात ते आठ लाखांचा फायदा मिळविला. प्रत्येक कुटुंबाला साधारण ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेती करताना सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केला जातो. या बचतगटातील शेतमजुरांना बायो-कंपोस्ट खत वापरण्याचे तंत्र शिकविले जाते. सल्फेटसारखे कमी रसायने असलेले खत वापरण्यासाठीही संस्थेच्या माध्यमातून प्रवृत्त केले जाते. डिसेंबर ते मे या काळात बचत गटातील शेतमजूर हे पिकाचे मालक असतात, एकदा का पीक काढले गेले की ते पुन्हा पुढच्या हंगामासाठी भात शेतीसाठी काम करू लागतात. सध्या बचत गटाच्या माध्यमातून १८ कुटुंबांतील शेतमजूर १२ एकर शेतीवर हा सामूहिक शेतीचा प्रयोग करीत आहेत.
सर्वविकास दीप संस्थेची २० सदस्यांची टीम आहे. दहा वर्षांपासून आम्ही माणगावमध्ये कार्यरत आहोत. आमच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या बचत गटातील प्रत्येक कुटुंबाला सध्या एक लाखाचे उत्पन्न मिळते. पण आम्ही एवढ्यावर नक्कीच समाधानी नाही. या कुटुंबांचे उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.
- रिची (भाऊ) माणगावकर, सर्वविकास दीप संस्था