आदिवासी राखीव मतदारसंघांमध्ये भरघोस मतदानाचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 03:19 AM2019-05-01T03:19:53+5:302019-05-01T03:20:11+5:30
अंतिम आकडेवारी जाहीर : राज्यात ५७.३२ टक्के मतदान
मुंबई : राज्यातील नंदुरबार, दिंडोरी आणि पालघर या तीन आदिवासी राखीव लोकसभा मतदारसंघात भरघोस मतदान झाले. मुंबईचा टक्का २०१४ पेक्षा अधिक असला तरी राज्यातील अनेक मतदारसंघांच्या तुलनेत हे मतदान कमीच आहे. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक ६८.३१ टक्के इतके मतदान झाले ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात. तेथे विद्यमान खासदार भाजपच्या डॉ. हिना गावितविरुद्ध काँग्रेसचे विद्यमान आमदार के. सी. पाडवी अशी मुख्य लढत होत आहे. आदिवासी राखीव दिंडोरीमध्ये ६५.७६ टक्के तर पालघरमध्ये ६३.७२ टक्के मतदान झाले. दिंडोरीत भाजपच्या डॉ. भारती पवारविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले असा मुकाबला आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव असा सामना आहे.
मुंबईमध्ये काँग्रेसची मदार ही परंपरागत मते, दलित, मुस्लिम आणि मनसेच्या मतदारांवर होती. भाजप-शिवसेना युतीची मदार मराठी, हिंदी भाषिक, गुजराती मतांवर आहे. कुठे किती मतदान झाले, यावर विजय ठरणार आहेत. महिलांची मतदान टक्केवारी ५५.३६
१७ मतदारसंघांमध्ये १ कोटी ६६ लाख ३० हजार ९३९ पुरुष मतदारांपैकी ९ लाख ८१८३६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ५९.०३ इतकी आहे. १ कोटी ४५ लाख ६० हजार ४३३ महिला मतदारांपैकी ८० लाख ६० हजार ६७७ महिलांनी मतदान केले. महिलांची मतदानाची टक्केवारी ५५.३६ इतकी आहे. १ हजार ४१३ तृतीयपंथी मतदारांपैकी ४३८ ने मतदान केले.