अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:42 AM2017-08-01T01:42:06+5:302017-08-01T01:42:06+5:30
राज्यात २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेण्यात येईल
मुंबई : राज्यात २ लाख ७ हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त विभागासोबत बैठक घेण्यात येईल, असे महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसंदर्भात गठीत समितीचा अहवाल मार्च महिन्यात प्राप्त झाला. त्या अहवालानुसार, वित्त विभागाला जून महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावासंदर्भातच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
अंगणवाडी सेविकांमधील सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ समितीने दिलेल्या अहवालात सुचविण्यात आली आहे. ही मानधनवाढ करताना कोणावरही अन्याय होणार नाही. अंगणवाडी सेविकांना केंद्र व राज्य शासनामार्फत मिळून एकत्रित मानधन देण्यात येते. यापूर्वी राज्याने २०१४-१५ मध्ये मानधनवाढ केली होती, त्यासाठी २६४ कोटी रुपयांचा वित्तीय भार तिजोरीवर पडला होता.
अंगणवाडी सेविकांचा, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे मे २०१७ पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले असून, १७ जूनपासून पीएफएमएस प्रणालीद्वारे अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात मानधनाची रक्कम जमा करण्यात येत आहे.