डीएनएमुळे पटली ‘त्या’ मृतदेहांची ओळख
By admin | Published: October 6, 2016 05:33 AM2016-10-06T05:33:16+5:302016-10-06T05:33:16+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत १७ दिवसांनी सापडलेले मृतदेह वाहक विलास देसाई आणि प्रवासी धोंडू कोकरे यांचे असल्याचे
दस्तुरी (खेड, जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर दरम्यानच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेत १७ दिवसांनी सापडलेले मृतदेह वाहक विलास देसाई आणि प्रवासी धोंडू कोकरे यांचे असल्याचे डीएनए चाचणीत निष्पन्न झाले आहे. तब्बल ४८ दिवसांनंतर या मृतदेहांवर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
२ आॅगस्टच्या रात्री सावित्री नदीवरील पूल तुटला आणि त्यात दोन एसटी बस वाहून गेल्या. दुर्घटनेनंतर १७व्या दिवशी १९ आॅगस्ट रोजी वेळासनजीक बाणकोट खाडीकिनारी गस्ती पथकातील पोलिसांना दोन मृतदेह सापडले. परंतु ते छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड होते. प्रशासनाच्यावतीने महाड येथील शासकीय रुग्णालयात सर्व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाईकांचे डीएनए घेण्यात आले होते. मृतांच्या नातेवाईकांना या संदर्भात कळवण्यात आले असून त्याप्रमाणे बुधवारी देसाई व कोकरे यांच्या नातेवाईकांनी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतले. चिंचघर-प्रभूवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
चाचणी केल्यानंतर डीएनए अहवालात हे मृतदेह जयगड-मुंबई एसटी बसचे वाहक विलास काशिनाथ देसाई (फुणगूस) व प्रवासी धोंडू बाबाजी कोकरे (खंडाळा-वरवडे) यांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.