‘गोमांसा’ची ओळख आता क्षणात पटणार
By admin | Published: July 10, 2017 04:43 AM2017-07-10T04:43:40+5:302017-07-10T04:43:40+5:30
वाढत्या हिंंसाचारामुळे देशभरात नाराजीचे वातावरण असताना, आता गोमांसची ओळख पटविणारे यंत्र उपलब्ध होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोमांस बाळगल्याच्या कारणावरून कथित गोरक्षकांकडून केल्या जाणाऱ्या वाढत्या हिंंसाचारामुळे देशभरात नाराजीचे वातावरण असताना, आता गोमांसची ओळख पटविणारे यंत्र उपलब्ध होणार आहे. गोमांसाचा शोध घेणारे ‘एलिसा किट’ बनविण्यात आले असून, घटनास्थळी त्याचा वापर करून, सत्यता पडताळता येणार आहे.
राज्यातील ४५ फिरत्या फॉरेन्सिक लॅबमध्ये ते लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. मटणाच्या नमुन्यावर पिवळा रंग येतो, त्याचा वापर करण्याबाबत पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
राज्यात व केंद्रात भाजपाशासित सरकार स्थापन झाल्यानंतर, गोहत्या व गोमांसावर बंदी घालण्यात आलेली आहे. काही नागरिक गोमांस बाळगत असल्याच्या कारणावरून, कथित गोरक्षकांकडून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, संबंधित मांस हे गायीचे आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवावे लागते. त्याचा अहवाल येण्यास काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे गोमांस त्वरित ओळखता यावे, यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या वतीने हैदराबादेतील एका वैज्ञानिकाबरोबर काही महिन्यांपासून काम करण्यात येत होते.
मटणाच्या नमुन्यावर ठरावीक प्रकारचे रसायन घातल्यानंतर, अर्धा तासामध्ये त्यावर पिवळा रंग येतो, त्यावरून ते गोमांस आहे की नाही, हे स्पष्ट होईल, असे फॉरेन्सिक लॅबचे संचालक के. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.
>पोलिसांनी मांस जप्त केल्यानंतर ते गोमांस आहे की नाही, याची सत्यता केवळ अर्ध्या तासामध्ये होणार आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना संशयिताला अटक करता येईल किंवा गोमांस नसल्याचे स्पष्ट झाल्यास, त्याला सोडता येणे शक्य आहे.