२८ तासांत साकारली २८ फुटांची गौतम बुद्धांची मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 09:24 PM2016-12-30T21:24:13+5:302016-12-30T21:24:13+5:30
शिल्पकार संजय खंडेराव यांनी २८ तासांमध्ये तथागत गौतम बुद्धांची २८ फुटांची (निद्रा) निष्णान अवस्थेतील मूर्ती तयार केली
ऑनलाइन लोकमत/राहुल सोनोने
वाडेगाव, दि. 30 - पातूर तालुक्यातील चतारी येथे शिल्पकार संजय खंडेराव यांनी २८ तासांमध्ये तथागत गौतम बुद्धांची २८ फुटांची (निद्रा) निष्णान अवस्थेतील मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती परिसरातील ग्रामस्थांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चतारी येथील शिक्षक प्रवीण सरदार यांनी शिल्पकार खंडेराव यांच्याकडे मूर्ती तयार करण्याची संकल्पना मांडली.
२८ डिसेंबर २०१६ला २८ तासांत २८ फुटांची मूर्ती खंडेराव यांनी साकारली. त्यांनी ही मूर्ती गावाला धम्मदान म्हणून दिली आहे. शिल्पकलेची आवड असलेल्या खंडेराव यांनी आपल्या शिल्पकलेला तथागतच्या मूर्तीपासून सुरुवात केली. त्यांना हा १० वर्षांपासून छंद असून ते विदेशातही मूर्ती बनविण्याचे काम करतात. दरवर्षी प्रत्येक संकल्प करून जेवढे तास मूर्ती बनविल्या जाईल तेवढी मोठी मूर्ती बनविण्याचा संकल्प ते करतात.
बुद्धांचा शांतीचा संदेश व त्यांचे अनुकरण समाजात रुजतील, यासाठी कुटुंबाकडे तुळशिपत्र ठेवून ते १० वर्षांपासून बाहेर आहेत. चतारी येथे बैठक घेऊन येथील विहाराच्या आवारात मूर्ती बनवण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यांना येथील शिक्षक प्रवीण शामराव सदार, पोलीस पाटील विजय सदार, पंडित सदार, यशवंत सदार यांनी सहकार्य करून सिमेंटमध्ये ही मूर्ती बांधण्यात आली. ही (निद्रा) निष्णान अवस्थेतील मूर्ती परिसरातील सर्वात मोठी आहे.त्यामुळे, मूर्ती पाहण्यासाठी दर्शनासाठी ग्रामस्थांची मोर्ठी गर्दी होत आहे.