भगवान वृषभदेवांच्या मूर्तीची गिनीज बुकात नोंद
By Admin | Published: March 7, 2016 03:48 AM2016-03-07T03:48:09+5:302016-03-07T03:48:09+5:30
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील पहाडावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंच विशालकाय मूर्तीची जैन तीर्थक्षेत्रात जगात सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून
नितीन बोरसे , सटाणा
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथील पहाडावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंच विशालकाय मूर्तीची जैन तीर्थक्षेत्रात जगात सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये रविवारी नोंद करण्यात आली. ११ फेब्रुवारीपासून सुरू असलेला भगवान वृषभदेव मूर्तीच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचा रविवारी उत्साहात समारोप झाला. सोहळ्यातच ही शुभवार्ता गिनीज बुकच्या टीमने दिली.
मांगीतुंगी पहाडावर २००२पासून १० वर्षे अखंड पाषाणाचा शोध सुरू होता. २०१२मध्ये अखंड पाषाण सापडल्यानंतर त्याच्यावर मूर्ती कोरण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. तब्बल ३५० मूर्तिकारांनी चार वर्षे मूर्तीवर काम केले. रविवारी सायंकाळी चंदनामतीमाता यांच्या हस्ते सर्वतोभद्र महालावरील मंडलिक ध्वजाचे अवतरण करून या महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या टीमने दिवसभर पहाडावरील भगवान वृषभदेव मूर्तीचे निरीक्षण करून मोजमाप केले. शिरापासून तळपायापर्यंत १०८ फूट उंचीची ही मूर्ती आहे. त्याचा टीमने अभ्यास करून सायंकाळी झालेल्या अखिल भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समितीच्या अधिवेशनात गिनीज बुकचे संचालक स्वप्निल डांगरीकर यांनी मूर्तीच्या विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले. डांगरीकर यांनी ज्ञानमतीमाता, पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी, चंदनामतीमाता, आचार्य अनेकांतसागर महाराज, महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल यांना भगवान वृषभदेव यांच्या १०८ फूट उंचीच्या विशालकाय मूर्तीची गिनीज बुकात नोंद झाल्याचे प्रशस्तिपत्र सुपुर्द केले. मूर्ती तयार करण्यासाठी लागलेला कालावधी, अवघड ठिकाणी केलेले खोदकाम, अखंड पाषाणात कोरलेली मूर्ती आणि तिची उंची याचा निकष नोंद करताना लावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नोंदीमुळे मांगीतुंगी जैन तीर्थक्षेत्राचे नाव आता जगाच्या नकाशावर कोरले जाणार असून, जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून हे स्थान नावारूपाला येणार आहे.
अखिल भारतीय जैन तीर्थक्षेत्र समितीच्या अध्यक्ष सरिता जैन, राज्याध्यक्ष प्रमोद कासलीवाल, डी. ए. पाटील, अभियंता सी. आर. पाटील, माजी अध्यक्ष आर. के. जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीलम अजमेरा, राष्ट्रीय महामंत्री संतोष पेंढारी, संजय पापडीवाल आदी या वेळी उपस्थित होते.