अयोध्येतल्या राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवा; संभाजी भिडे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 03:29 PM2020-08-03T15:29:39+5:302020-08-03T15:29:53+5:30
अयोध्येतल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडेंची मागणी
मुंबई: राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अयोध्येत सुरू झाली. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत शिलान्यास करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठात हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. अयोध्येच्या राम मंदिरात बसवण्यात येणारी प्रभू रामांच्या मूर्तीला मिशी असावी, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.
प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवतं आहेत. पण राम, लक्ष्मण यांची चित्रं काढताना, त्यांच्या मूर्ती साकारताना चित्रकार, शिल्पकारांनी चूक केली की काय असं माझ्या लक्षात येतं. त्यामुळे राम मंदिरात जी मूर्ती बसवली जाईल, ती मूर्ती मिशीवाली असावी. आतापर्यंत झालेली चूक आपण दुरुस्त करणार नसू, तर मंदिर होऊनही न झाल्यासारखंच आहे, असं संभाजी भिडे म्हणाले.
राम मंदिराचा शिलान्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं, असंदेखील संभाजी भिडे यांनी म्हटलं. 'भारत नावाचं राष्ट्र शिवछत्रपतींमुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे भूमिपूजनाला आपण त्यांची आठवण ठेवू. शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की, असं कवीभूषण यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राम मंदिराच्या पायाभरणीवेळी शिवप्रतिमेची पूजा अगत्यानं करावी, असं संभाजी भिडे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल केलेल्या विधानांवरही संभाजी भिडेंनी भाष्य केलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्हीही नेते सन्माननीय आहेत. पण ते गोंधळलेले आहेत, असं मत भिडे यांनी व्यक्त केलं. कोरोनाचं संकट पाहता राम मंदिराचं ई-भूमिपूजन करावं, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. तर राम मंदिरामुळे कोरोना संकट दूर होणार का, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता.