Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 01:27 PM2023-05-10T13:27:46+5:302023-05-10T13:30:15+5:30
सर्वोच्च न्यायालय शिंदे गटला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळ देऊ शकते का? सत्तासंघर्षावरील तुमच्या आमच्या मनाला सतावणारे अनेक प्रश्न, त्यांची उल्हास बापट यांनी दिलेली उत्तरे...
१६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे गट-भाजपाच्या सरकारला धोका नाही असे शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील सांगत आहेत. परंतू घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांच्या मते निकाल काय असेल, हे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी 16 आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे राज्यात काय होईल याचेही भाकीत केले आहे.
लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत घेतली. यावेळी बापट यांनी काही शक्यता वर्तविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे.
समजा न्यायालयाने पक्षांतर बंदी कायदा लागू होतोय, परंतू तुमच्याकडे ४० आमदार आहेत मग एक ठराविक कालावधी देऊन तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सर्वोच्च न्यायालय म्हणू शकते का, या सवालावर याला डॉक्टीन ऑफ सायलेन्सेस असे आम्ही म्हणतो. १० व्या कलमानुसार तुम्ही पक्षाच्या विरोधात मतदान करणार असाल तर आधी पक्षाची परवानगी काढा किंवा पुढच्या १५ दिवसांत पक्षाने तुम्हाला माफ करायला हवे. इथे आता १० महिने झाले आहेत. यामुळे असा अर्थ घटनेचा लावता येणार नाही, असे बापट म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आता तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सांगण्याची सुतराम शक्यता नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालय तुमच्या मते काय निकाल देईल, असा सवाल विचारला असता बापट यांनी गेल्या १० वर्षांपासून मी जे अंदाज व्यक्त केले ते बरोबर आले आहेत. ईडब्लूएसचा एक अपवाद वगळता सर्व माझे निष्कर्ष बरोबर ठरले आहेत. दोन तृतियांश लोक बाहेर पडले तर ते एकाचवेळी बाहेर पडायला हवे. १६ जे बाहेर पडले ते दोन तृतियांश होत नाहीत. घटनेशी विसंगत गोष्ट, यामुळे घटनेमुळे ते अपात्र ठरायला हवेत. शिंदे राजीनामा देणार, म्हणजे हे सरकार पडणार. माझ्यामते कोणालाही बहुमत मिळत नाहीय. नार्वेकर इंग्लंडवरून काय शोध लावून येतील माहिती नाही. परंतू राज्यात राष्ट्रपती राजवट येईल, सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. महाराष्ट्राची जनता ठरवेल ठाकरे बरोबर की शिंदे की फडणवीस. अंतिम अधिकार जनतेकडे असेल, असे बापट म्हणाले.
आताच्या ज्या पाच जणांच्या बेंचने दिलेला निर्णय हा महाराष्ट्रापुरताच लागू होणार आहे. रेबियासह आतापर्यंत तीन खटले झालेत. सातचे बेंच नेमून याचा निर्णय करता येईल, यामुळे कायदा भारतभर लागू होईल. परंतू ते पुढचे पाऊल झाले. हा खटला पुढे सात जणांकडे नेणे चुकीचे ठरेल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.