Prithviraj Chavan १६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:05 IST2024-01-10T11:27:26+5:302024-01-10T12:05:51+5:30
If 16 MLAs are disqualified, there will be a political Earthquake in Maharashtra - Prithviraj Chavan ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे असंही चव्हाण यांनी सांगितले.

Prithviraj Chavan १६ आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल - पृथ्वीराज चव्हाण
पुणे - आजचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जर आज १६ आमदारांना अपात्र केले आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही अशी परिस्थिती समोर आली तर हा एकप्रकारे राजकीय भूकंप ठरेल असं विधान काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
आमदार अपात्रतेबाबत पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले की,आजच्या निकालात दोन बाजू आहेत. एक घटनात्मक तर दुसरी राजकीय. आजचा निकाल राज्यातील सर्व पक्षांकरता महत्त्वाचा आहे. जर घटनात्मकदृष्टीने याकडे पाहिले तर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या १० व्या सूचीनुसार पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या १६ आमदारांना निलंबित केले पाहिजे. त्यांचे मंत्रिपद रद्द झाले पाहिजे. त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत. ही कायदेशीर बाब आहे. परंतु कायद्यात त्रुटी म्हणजे न्यायाधीश म्हणून जे काम पाहतात ते विधानसभा अध्यक्ष एका राजकीय पक्षाचे असतात. निकाल देताना ते राजकीय पक्षाचे हित लक्षात न घेता निकाल देणार असतील तर ती अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे. जो राजकीय पक्षाने निवडून आणलेला व्यक्ती आहे. या कायद्यातील हा दोष आहे. त्यामुळेच या निकालाला जवळपास दीड वर्ष विलंब झाला आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात बदल गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कदाचित भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभेच्या निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात सामोरे जायचे हा संभ्रम आहे. त्यामुळे निकालातून तोही प्रश्न सोडवला जाईल का हा मुद्दा आहे. नेतृत्व बदल करण्याची ही वेळ आहे. जर पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत पक्षांतर बंदी झाली नाही असा निकाल आला तर दुर्दैवाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील. कोर्ट कचेरी, आंदोलने करावी लागेल. घटनेची पायमल्ली झालीय हे लोकांना सांगावे लागेल. त्यामुळे ४ वाजता काय निकाल येतो हे पाहावे लागेल असंही चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान, संसदीय परंपरेला हे शोभून नाही. विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेत हे पाहिले नाही. त्यामुळे कशाप्रकारे निकाल लागेल याचा अंदाज मिळतो. भाजपाला नेतृत्व बदलाची संधी या निकालातून आहे. परंतु आजच ते करतील का हे माहिती नाही. ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यावर आमचे खूप आक्षेप आहेत. उद्या काहीही घडू शकेल असं वाटतं असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.