'५५ वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...' फडणवीसांचा पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:55 PM2024-03-07T16:55:22+5:302024-03-07T17:05:38+5:30
Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar: मला शरद पवार म्हणतात. माझ्या वाटेला गेलात, तर मी सोडत नाही, अशा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला होता. या इशाऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
आज लोणावळ्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर निशाणा साधला होता. मला शरद पवार म्हणतात. माझ्या वाटेला गेलात, तर मी सोडत नाही, अशा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला होता. या इशाऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत. आज इतकी वर्षे ते राजकारणामध्ये आहेत. राजकारणात जवळपास त्यांची ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाला अशा प्रकारे धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी शरद पवार यांना सल्ला देण्याएवढा मोठा नाही. पण मला वाटतं त्यांनी याचा पुनर्विचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत हे विचारात घेतलं तर त्यांनी अशा प्रकारे आमदाराला धमकी दिली तर त्यांचा स्तर खाली येईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
आमदार सुनील शेळके यांनी आपल्या कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्याचा आरोप करताना शरद पवार म्हणाले होते की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे येत आहात म्हणून त्यांनी तुम्हाला धमकी दिल्याचं मला समजलं. मी त्यांना सांगू इच्छितो की, सुनील शेळके तू आमदार कुणामुळे झाला. तुझ्या सभेला कोण आलं होतं. त्यावेळी पक्षाचा अध्यक्ष कोण होता. तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे लक्षात ठेवा. माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, असा इशार शरद पवार यांनी दिला होता.