कृषी कायदे आधीच मागे घेतले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता - प्रवीण तोगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:05 PM2021-12-08T17:05:25+5:302021-12-08T17:06:10+5:30
Pravin Togdiya Slams Central Government : प्रायश्चित्त करायचे असेल तर मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी स्पष्ट केले.
बुलडाणा : मुस्लीम स्त्रियांच्या सन्मानासाठी कायदे केले जातात, सोबतच ज्यांनी देशावर आक्रमण केले त्याचा फोटो अफगाणिस्तानातील संसदेत लावण्यासाठी ५०० कोटी दिले जातात; मात्र कृषी कायद्याविरोधात आंदोलन बळी गेलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली जात नाही, असे परखड मत व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल १० महिन्याआधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी स्पष्ट केले.
बुधवारी बुलडाण्यातील एका मंगल कार्यालयात ८ डिसेंबर रोजी आयोजित हिंदू मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. कृषी कायदे लवकर परत घेतले असते तर ७०० आया-बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले नसते. म्हणून या परिवारांना केवळ ७०० कोटींची मदत देणे खूप काही कठीण नाही. मोदी सरकारने त्यांना तत्काळ मदत करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा तोगडिया यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांना आणि सैनिकांना दगडं मारणारे खरे देशविरोधी आहेत. पोलीस यंत्रणा ही देशाचा सन्मान आहे. त्यांचा मान राखलाच पाहिजे. तर आतापर्यंत हिंदूंनी कधीच पोलिसांचा अपमान केला नसल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम अदा न करता ते धार्मिकस्थळातच केले जावे असे वक्तव्यही त्यांनी केले.
शिवसेना खरी देशभक्त
यावेळी हिंदू म्हणजे अफाट आहे. मग तो कोणत्याही पक्षातील असो. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील नेते, कार्यकर्ते जे कोणी हिंदू असतील ते माझेच आहेत. तर शिवसेना कोणाही सोबत जावो ते खरे हिंदू आणि राष्ट्रभक्तच आहेत. कारण त्यांच्या पूर्वजांनी कधीच तुष्टीकरणाचे समर्थन केले नाही. तेव्हा शिवसेना हा पक्ष खरा राष्ट्रभक्त आहे; मात्र अभिनेत्री कंगना रनौत संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.